माकपचे आमदार व अभिनेते असलेले एम. मुकेश तसेच आणखी तीन कलाकारांवर लैंगिक छळ व बलात्कारप्रकरणी गुन्हे नोंदविण्यात आले. मल्याळी चित्रपटसृष्टीतील लैंगिक छळ व भेदभावप्रकरणी केरळ सरकारने नेमलेल्या न्या. के. हेमा समितीने आपला अहवाल सादर केला होता. त्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर एम. मुकेश, जयसूर्या, मणियनपिल्ला राजू, इडावेला बाबू या चौघांवर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.
माकपचे आमदार असलेले एम. मुकेश यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. डाव्या आघाडीतील काही पक्षांनीही या मागणीला पाठिंबा दर्शविला होता. एम. मुकेश यांना ३ सप्टेंबरपर्यंत अटक करू नये, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. भाकपचे नेते डी. राजा यांनी एम. मुकेश यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
या कलावंताने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार एका महिला कलाकाराने केल्यानंतर याप्रकरणी वादळ निर्माण झाले. एलडीएफ आघाडीचे निमंत्रक ई. पी. जयराजन यांनी सांगितले की, याआधी दोन आमदारांवर बलात्काराचे गुन्हे दाखल झाले होते; पण त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेले नाहीत. एम. व्हिन्सेंट व एल्डोस कुन्नापल्ली या आमदारांकडे जयराजन यांच्या वक्तव्याचा रोख होता