जत तालुक्यातील साळमळगेवाडी येथे अनैतिक संबंधातून कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील मदभावी येथील ३५ वर्षीय निवृत्ती उर्फ आप्पासाहेब सिद्राया कांबळे या तरुणाचा जबर मारहाण करून खून करण्यात आला असल्याची फिर्याद त्यांची पत्नी कविता कांबळे हिने दिली आहे.
महिनाभरानंतर या खुनाचा उलगडा झाला आहे.१२ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री सव्वा अकरा वाजता साळमाळगेवाडी येथे निवृत्ती यांचा मृत्तदेह जत तालुक्यातीलच एकुंडी क्रॉस येथील बस स्थानकाच्या कट्ट्यावर १३ ऑगस्ट रोजी आढळून आले होते.
याप्रकरणी मयत निवृत्ती याची पत्नी कविता हिने प्रथम अथणी पोलीस ठाण्यात पती निवृत्ती यांचा खून झाल्याची फिर्याद दिली होती. त्यानंतर हा खून अनैतिक संबंधातून झाल्याची माहिती मिळताच मयत निवृत्ती यांची पत्नी कविता यांनी दिलेल्या पुरवणी जबाबात आपल्या पतीचा खून हा अनैतिक संबंधातून झाल्याचा जबाव दिला. कविता कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनैतिक संबंध ठेवणाऱ्या महिलेचा पती,दिर,भाऊ,नातेवाईक व महिलेच्या भावाचा मित्र अशा आठ जणांविरुद्ध खुनासह अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
कर्नाटकातील बेळगाव पोलीस अधीक्षकांनी सदरचा गुन्हा सांगली पोलीस अधीक्षक यांच्याकडे वर्ग केल्यानंतर सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाने जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा गुन्हा घडल्याने हा गुन्हा जत पोलीस ठाण्याकडे १६ सप्टेंबर रोजी वर्ग केला आहे.त्यानंतर मंगळवारी १७ सप्टेंबर रोजी कन्नड मधील जबाब मराठीत घेवून वरील आठ जणाविरुद्ध जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.