गांजा विक्रीचे पैसे थेट बैंक खात्यावर घेण्यासाठी इतर दुकानदारांप्रमाणे क्यूआर कोड असलेला स्कॅनर बाळगणारा तस्कर सांगवी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. मूळचा ओडिशा येथील असलेल्या गांजा तस्कराकडून तीन किलो २२० ग्रॅम गांजा जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि. १५) पिंपळे निलख येथे करण्यात आली.
बसिस्ट जरभान साहू (३८, रा. विशालनगर, पिंपळे निलख. मूळ रा. कुंदाबुटला, चुलीफुनका, जि. बालांगीर, ओडिशा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलिस ठाण्यातील पोलिस विशालनगर पिंपळे निलख येथे गस्त घालत असताना पोलिसांना पाहून एक व्यक्ती पळून जाऊ लागली. त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेतली असता, त्यामध्ये तीन किलो २२० ग्रॅम गांजा मिळून आला. तसेच एक मोबाईल फोन आणि बँकेचा स्कॅनर आढळून आला.
चार दिवसांची पोलिस कोठडी
बसिस्ट साहू हा इतर दुकानदारांप्रमाणे बँकेचा स्कॅनर बाळगत असे. गांजा विक्रीतून येणारी रक्कम तो डिजिटल स्वरूपात थेट बँकेच्या खात्यात घेत असे. त्याला न्यायालयात हजर केले असता, त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलिस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बनसोडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.