कुणबी जात प्रमाणपत्राच्या अनुषंगाने अहवाल देण्यासाठी तीन हजारांच्या लाचेची मागणी करून, तडजोडीने एक हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याप्रकरणी मंडळ अधिकाऱ्याविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आली. शंकर विठ्ठल केकाण (वय ५५ रा. गोविंद बापू नगर, जेऊर ता. करमाळा जि. सोलापूर) असे मंडळ अधिकाऱ्याचे नाव आहे. ते करमाळा तालुक्यातील केत्तूर येथील मंडळ अधिकारी आहेत.
तक्रारदाराने मुलीच्या कुणबी जात प्रमाणपत्रासाठी कार्यालयात अर्ज केला होता, त्या अनुषंगाने प्राप्त कागदपत्रांवरून अहवाल देणे आवश्यक होते. त्या करिता शंकर केकाण यांनी तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांची मागणी केली. मात्र तडजोडीने एक हजार रुपये स्वीकारण्यास संमती दिली असे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, हवालदार अतुल घाडगे, पोलिस शिपाई सचिन राठोड, गजानन किणगी, सलिम मुल्ला, चालक सुरवसे व गायकवाड यांनी पार पाडली. शंकर केकाण यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ७ प्रमाणे रात्री गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.