शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून बुधवारी मध्यरात्री विजयपूर-गुहागर महामार्गावरील दुकान फोडले. तसेच शंकर कॉलनीतील एक घर फोडल्याची घटना घडली. गुरुवारी दुपारी बँक ऑफ इंडियात ग्राहकाचे एक लाख रुपये बँकेतूनच लंपास केले. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शहरात घबराट पसरली आहे.याबाबतची माहिती अशी, नरेंद्र किशोर मूलचंदानी यांचे विजयपूर- गुहागर महामार्गावर बॉम्बे कन्फरेशन – नावाचे दुकान आहे. बुधवारी नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून घरी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या दुकानावरील पत्रे उचकटून दुकानात प्रवेश केला व दुकानातील साहित्याची नासधूस केली.
सीसीटीव्ही कॅमेरे उचकटले तसेच खेळणी लंपास केली. त्यानंतर दुसऱ्या दुकानात प्रवेश करून काऊंटरमधील साडेतीन हजाराच्या रोकडवर डल्ला मारला. तसेच शंकर कॉलनीत शिवा माळी यांची दुमजली इमारत आहे. वरच्या मजल्यावर खोलीला कुलूप लावून ते झोपले होते. त्यांच्या खालच्या घराला चोरट्यांनी बाहेरून कडी घातली. वरच्या मजल्यावरील खोलीचा कडी- कोयंडा तोडून खोलीत प्रवेश केला. मात्र खोलीत काहीही मिळाले नाही.
दोन महिला चोरट्यांचे कृत्य
शहरातील मार्केट यार्डसमोर बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. गुरुवारी दुपारी या शाखेत ग्राहकांची गर्दी होती. बाळासाहेब नामदेव पाटील यांनी खात्यावरील दोन लाख सात हजार रुपये काढून पिशवीत ठेवले होते. कर्मचाऱ्यांकडे ते इतर चौकशी करीत असताना दोन महिला चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन त्यांची पिशवी ब्लेडने फाडली व त्यातील एक लाखाची रोकड लंपास केली. त्यांनी नंतर पिशवी तपासली असता पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी बँकेतील अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर सीसीटीव्ही चेक करण्यात आले. यात दोन महिलांनी रोकड लंपास केल्याचे दिसून आले