चोरीचा बनाव करून प्रेयसीच्या पतीचा खून

0
9
This is a photo of a butcher knife surrounded by fake blood.Click on the links below to view lightboxes.

अनैतिक संबंधांच्या वादातून जबरी चोरीचा बनाव करून शुक्रवारी (दि. २०) मध्यरात्री कर्वेनगरमध्ये एकाचा कोयत्याने हल्ला करून निघृण खून करण्यात आला. यासंदर्भात पोलिसांनी वेगवान तपास करत रातोरात संशयित तरुणाला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आणखी काही आरोपी सामील असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे.

राहुल पंढरीनाथ निवंगुणे (वय ४२, रा. कर्वेनगर) हे मृताचे नाव आहे. प्रसन्न साहेबराव कोकरे (वय २७, रा. आनंद विहार, सिंहगड रोड) हे आरोपीचे नाव आहे. त्याला तपासासाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. निवंगुणे याच्या पत्नीशी कोकरे याचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यातून उभयतांमध्ये यापूर्वी भांडणे झाली आहेत. हे संबंध पसंत नसल्याने निवंगुणे यांनी कोकरेला मारहाण केली होती. आपल्या संबंधात अडथळा ठरत असलेल्या निवंगुणे यांचा काटा काढण्यासाठी कोकरेयाने कट रचला. त्यानुसार, कोकरे
मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास निवंगुणेच्या घराजवळ बुरखा घालून गेला. त्याने दरवाजा वाजवला. त्यामुळे जागी झालेल्या निवंगुणे यांनी दरवाजा उघडला. त्यासरशी कोकरे याने कोयत्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. या आवाजाने त्यांची पत्नी व तीन मुलीही धावत दारात पोचल्या. त्यांच्यासमोरच कोकरे याने कोयत्याने सपासप निवंगुणे यांच्यावर वार केले. हा आवाज ऐकून स्थानिक रहिवासी तेथे धावले. त्यांना पाहून बुरखाधारी कोकरे पळून गेला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या निवंगुणे यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, घाव वर्मी बसल्याने व अतिरक्तस्रावाने निवंगुणे उपचारापूर्वीच मरण पावले.
डोळ्यादेखत वडिलांची निघृण हत्या झाल्याने त्यांच्या तिन्ही मुलींना कमालीचा मानसिक धक्का बसला आहे. दरम्यान, हत्येच्या या प्रकारानंतर वारजे पोलिसांसह शहर गुन्हे अन्वेषण विभागाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. खंडणीविरोधी पथकाचे (युनिट एक) वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संख्ये व त्यांच्या पथकाने कसोशीने तपास करून आरोपी कोकरे याला बेड्या ठोकल्या.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here