जत : ग्रामपंचायतीमार्फत दिली जाणारी प्रमाणपत्रे मोबाइलवरून घरबसल्या काढता येत आहेत. यासाठी महा-ई-ग्राम सिटिझन अँप विकसित करण्यात आले आहे.या अँपवर जिल्ह्यातील १४९२ ग्रामपंचायतींची नोंद झाली आहे. तर अँपवरून ३३ प्रकारचे दाखले मिळत असल्याने लोकांना वारंवार हेलपाटे मारण्याची गरजच राहिलेली नाही.यासाठी महा-ई-ग्राम सिटिझन कनेक्ट अँप डाउनलोड करून नागरिकांना सेवा घेता येणार आहे.सरकारी कार्यालयांमध्ये मारावे लागणारे हेलपाटे आणि त्यामुळे होत असलेला मनस्ताप या सुविधेमुळे वाचण्यास मदत होणार आहे.जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी दाखला, दारिद्रयरेषेखालील प्रमाणपत्र, असेसमेंट उतारा असे ३३ प्रकारचे दाखले महा-ई-ग्राम सिटिझन अँपवरून नागरिकांना मिळतात. तसेच या अँपवरून संबंधित ग्रामस्थाला त्याच्याकडील मिळकतींना लागणारा कर व भरलेल्या कराची स्थिती घरबसल्या पाहता येते.
महा ई-ग्राम सिटिझन अँप
गावातील नागरिकांना विविध कागदपत्रे आणि दाखले घरबसल्या मिळावेत यासाठी ‘महा-ई-ग्राम सिटिझन कनेक्ट’ हे अँप शासनाने विकसित केले आहे. यूजरनेम व पासवर्डच्या आधारे विविध दाखले, प्रमाणपत्रासाठी या अँपद्वारे अर्ज केल्यानंतर थेट ग्रामपंचायत कार्यालयात दाखल होऊन पुढील कार्यवाही होते.
मोबाइलवर अँप कसे घ्याल ?
प्ले स्टोअरवरून महा-ई- ग्राम सिटिझन कनेक्ट अँप डाउनलोड करावे लागते. नाव, लिंग, जन्मतारीख, मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी आदी माहिती प्रोफाइलमध्ये भरून नोंदणी करावी. त्यानंतर यूजरनेम आणि पासवर्ड प्राप्त होतो.
हजारो लोकांनी घेतला लाभ…
राज्य शासनाने विकसित केलेल्या या अँपचा फायदा जिल्ह्यातील हजारो लोकांनी घेतलेला आहे. या अँपमुळे ग्रामपंचायतीत न जाता घरबसल्या दाखला मिळविता येत आहे.







