संख: संख (ता. जत) येथील तुकाराम बाबूराव पाटील (५५, रा. पाटील वस्ती, संख) यांच्यावर एकाने चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले. कांबळे गल्लीत रात्री हा प्रकार घडला. संशयित महेश मल्लाप्पा कांबळे (३२) याच्यावर उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी,
तुकाराम पाटील हे बुधवारी (दि. १६) सायंकाळी साडेसात वाजता शेतात कामाकरिता नेहमी येणाऱ्या शेतमजूर शिवाबाई कांबळे व अश्विनी कांबळे यांना काम सांगायला गेले होते. अश्विनी कांबळे व संशयित महेश कांबळे यांच्यात त्यांच्या घरासमोर वाद सुरू होता. तुकाराम यांनी भांडणाचे कारण विचारल्यानंतर अश्विनी यांनी महेश खूप दिवसापासून त्रास देत असल्याचे सांगितले. महेश कांबळे याने विचारणा करणाऱ्या तुकाराम यांना शिवीगाळ केली. चाकूने त्यांच्या उजव्या गालावर व ओठावर वार केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. यात तुकाराम पाटील हे गंभीर जखमी झाले. अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.