हुलजंतीत महालिंगराया यात्रेला पाच लाख भाविकांची हजेरी | सात पालख्यांचा ऐतिहासिक सोहळा

0
0

सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे श्री महालिंगराया यात्रेला यंदा सुमारे पाच लाखांहून अधिक भाविकांनी उपस्थिती लावली. महालिंगरायाच्या मुख्य पालखीसह सात मानाच्या पालख्यांचा भेट सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ‘महालिंगरायाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने अवघी हुलजंती नगरी दुमदुमून गेली.

सात पालख्यांची समोरासमोर भेट होताच भाविकांनी भंडाऱ्याची मुक्तहस्ते उधळण केली. त्यामुळे संपूर्ण परिसर पिवळाजर्द झाला. ढोल, कैताळ आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात हा भक्तिमय सोहळा रंगला. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा यांसह पाच राज्यांतील भाविकांनी यात्रेसाठी गर्दी केली होती.

दुष्काळावर श्रद्धेची मात

यंदा सोलापूर जिल्ह्यासह सीमावर्ती भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे यात्रेतील गर्दीवर परिणाम होण्याची शक्यता होती. मात्र, पाणीटंचाई आणि दुष्काळाचे सावट बाजूला सारत भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

महालिंगराया यात्रा धार्मिक उत्सवाबरोबरच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक मानली जाते. मराठी आणि कानडी संस्कृतीचा अनोखा संगम या यात्रेत पाहायला मिळाला.

भाविकांना शिस्तबद्ध दर्शन घेता यावे, तसेच वाहतूक सुरळीत राहावी यासाठी स्थानिक प्रशासन आणि यात्रा समितीने विशेष नियोजन केले होते. श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा अनोखा संगम असलेल्या या यात्रेने हुलजंती परिसर भक्तिमय झाला.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here