भाजप महायुतीकडून जत विधानसभा मतदारसंघात प्रबळ दावेदार असणारे जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या उपस्थितीत आज साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केला.अजून भाजपा उमेदवारीचा पेच सुटलेला नाही,नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार कि,मतदारसंघ अन्य पक्षाला जाणार यावर खल सुरू आहे.मात्र याची पर्वा न करता प्रकाश जमदाडे यांनी आघाडी घेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.जमदाडेही भाजपाकडून प्रमुख दावेदार आहेत.
जत विधानसभेसाठी भाजपकडून प्रकाशराव जमदाडे यांनी गेल्या दोन वर्षापासून जोरदार तयारी केली आहे. तालुक्यातून ते भूमिपुत्र म्हणून प्रबळ दावेदार आहेत.जतच्या जागेचा भाजपचा तिढा अजून सुटला नसला तरी गुरुवारचा गुरुपुष्यामृत योग साधत त्यांनी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी कडून आपले नाम निर्देशन पत्र दाखल केले.
यावेळी बोलताना प्रकाशराव जमदाडे म्हणाले, आज आम्ही जगताप साहेबांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला आहे. या मतदार संघात पक्ष भूमिपुत्रलाच उमेदवारी देईल, असा आमचा विश्वास आहे. हा मतदार संघ महायुतीला पोषक आहे. शिवाय जानता आमच्या पाठीशी ठाम असून, त्यानुसार आमची पुढील वाटचाल सुरु आहे. मेरिट नुसारच उमेदवार ठरला जाईल, याचीही खात्री आहे. यावेळी भैय्या कुलकर्णी, अविनाश वाघमारे, रवींद्र सावंत, योगेश होनमाने उपस्थित होते.
जत विधानसभा मतदार संघातून आ. गोपीचंद पडळकर हे भाजपकडून इच्छुक आहेत. तशी तयारीही त्यांनी सुरू केली आहे. परंतु त्यांच्या उमेदवारीला पक्षातूनच मोठा विरोध होवू लागला आहे. माजी आमदार विलासराव जगताप, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे आणि तमणगौंडा रवी पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला आहे. आमच्या तिघांपैकी कोणालाही उमेदवारी दया परंतु पडळकरांना उमेदवारी दिल्यास आम्ही बंडखोरी करू असा इशारा त्यांनी दिला आहे.