टोळीने तपासणी अधिकारी असल्याचे सांगून लांबविली होती रक्कम
तावडे हॉटेल येथे तपासणी अधिकारी असल्याचे सांगून व्यावसायिकाची २५ लाख ५० हजारांची रक्कम लांबिवणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छडा लावला. या गुन्ह्यातील तिघांना शुक्रवारी (दि. १५) दुपारी पुईखडी येथून अटक केली.
त्यांच्याकडून लुटीतील २५ लाख रुपये आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार असा सुमारे ५५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या टोळीतील तिघे संशयित सराईत गुन्हेगार आहेत. या गुन्ह्यातील संजय महादेव किरणगे (४२, रा. विक्रमनगर, ता. करवीर), अभिषेक शशिकांत लगारे (२४) आणि विजय तुकाराम खांडेकर (२८, दोघे रा. उचगाव, ता. करवीर) यांना पोलिसांनी अटक केली. स्वप्नील उर्फ लाला तानाजी जाधव (रा. पाचगाव) आणि हर्षद खरात (रा. राजारामपुरी)
या दोघांचा अद्याप शोध सुरू आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यात्रेत पाळणे लावणारे व्यावसायिक सुभाष लक्ष्मण हारणे (वय ५०, रा. बागल चौक, कोल्हापूर) हे १२ नोव्हेंबरला पहाटे व्यवसायाची २५ लाख ५० हजारांची रक्कम घेऊन कर्नाटकातून तावडे हॉटेल येथे आले. खासगी ट्रॅव्हल्समधून उतरताच सर्व्हिस रोडला त्यांना पाच जणांच्या टोळीने अडवले. तपासणी अधिकारी असल्याचे सांगत त्यांची झडती घेतली.
चार दिवसांत तिघांना अटक
जवळ मोठी रक्कम असल्याचे दिसताच हारणे यांना कारमध्ये बसवून संशयित सरनोबतवाडीच्या दिशेने गेले. रक्कम आणि मोबाइल काढून घेऊन त्यांनी पोबारा केला होता. फिर्याद दाखल होताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ६ पथकांनी संशयितांचा शोध सुरू केला होता. चार दिवसांत तिघांना अटक करून पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा केला.