माडग्याळ बोरांची पुणे, मुंबईकरांना भुरळ

0
18

जत‌ : आजपर्यंत जतच्या केवळ दुष्काळी पट्टयातील रानमेवा म्हणून परिचित असलेल्या माडग्याळी बोरांनी आता हळूहळू बाजारपेठ काबीज करायला सुरुवात केली आहे. या माडग्याळ देशी बोरांची पुणे, मुंबईच्या खवय्यांना भुरळ घातली आहे. या भागातील शेतकऱ्यांनीही आता माडग्याळी बोरांची लागवड करायला सुरूवात केल्याचे दिसत आहे.

जत तालुक्यातील माडग्याळ, व्हसपेठ, सोन्याळ, आसंगी, अंकलगी या भागात बोरांची ही परंपरागत देशी झाडे आढळतात. ही झाडे नैसर्गिकरीत्या उगवून येतात. या भागातील प्रत्येक शेताच्या बांधावर किमान २५ ते ३० बोरांची झाडे हमखास आढळून येतात. अनेक शेतकऱ्यांनी ती प्रयत्नपूर्वक जतन करून ठेवलेली दिसून येतात. माडग्याळ व परिसरात बोरांच्या एका झाडाला सरासरी शंभर ते पाचशे किलो बोरे मिळतात. ही बोरे चवीला आंबट गोड, आकाराने जांभळाएवढी व निमूळती असतात.

कोणत्याही वातावणात टिकून राहण्याची या झाडांची क्षमता असते. पाण्याचीही फारशी अपेक्षा नसते.जत तालुक्यातील माडग्याळ हे गाव देशी शेळ्या, माडग्याळ मेंढी यासाठी महाराष्ट्रात प्रसिध्द आहेच. त्याचबरोबर इतर राज्यातही आपला आगळावेगळा देशीपणा टिकवत आपले वर्चस्व निर्माण केले आहेच. मग ते देशी मटकी असेल, धान्य, कडधान्य असतील किंवा भाजीपाला असेल तर सेंद्रिय खतावरच उत्पादन घेतले जात आहे. आता याच मातीतील माडग्याळ बोरांनाही महाराष्ट्रात मागणी वाढली आहे. माडग्याळची बोरं आता पुणे, मुंबईच्या बाजारपेठांमध्ये पोहोचली आहेत. माडग्याळच्या बोरांनी आपला वेगळाच बॅण्ड निर्माण केला असून, कृषी विभागाने पुढाकार घेतल्यास यालाही चांगले दिवस येतील.

बोरांचा हंगाम सुरू

ऑक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यांत संक्रांतीच्या दिवसांपर्यंत हा बोरांचा हंगाम असतो. चवीला आंबट गोड असणाऱ्या या बोरांना बाजारपेठेत मोठी मागणी असते.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here