मृताच्या कुटुंबियांची मागणी : पोलीस ठाण्यासमोर दोन दिवसांपासून उपोषण
तालुक्यातील वायफळे येथील ओंकार उर्फ रोहित संजय फाळके या युवकाचा 12 डिसेंबर रोजी खून झाला. विशाल सज्जन फाळके याने पूर्ववैमनस्यातून पुण्यातून आपली टोळी आणून हे कृत्य केले. याप्रकरणी मुख्य संशयित विशाल फाळके याच्यासह 5 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अद्यापही 3 ते 4 आरोपी फरार आहेत. या सर्व आरोपींना मोका लावा. त्यांना फाशी द्या, यासह अन्य मागण्यांसाठी मृत रोहितच्या कुटुंबीयांनी गेल्या दोन दिवसांपासून तासगाव पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण केले. आज आमदार रोहित पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. तसेच पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याशी चर्चा केली.
वायफळे येथील संजय फाळके व विशाल फाळके कुटुंबीयांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ कारणावरून वाद सुरू आहेत. याच वादातून हाणामारीच्या घटना घडल्या होत्या. एकमेकांना गंभीर जखमी होईपर्यंत मारहाण झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही कुटुंबांमधील हा वाद धुमसत होता. गाव पातळीवर तो मिटवण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्याला यश आले नाही. याच वादातून दोन्ही कुटुंबांमधील अनेकांवर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत.
12 डिसेंबर रोजी रोहित फाळके हा वायफळे येथील बस स्थानक चौकात आपल्या मामांच्या मुलासोबत थांबला होता. त्याचवेळी विशाल फाळके याने पुण्याहून आणलेल्या टोळीच्या मदतीने रोहित फाळके, आशिष साठे व आदित्य साठे या तिघांवर खुनी हल्ला केला. त्या ठिकाणी बसलेल्या सिकंदर शिकलगार यांनाही मारहाण केली.
या ठिकाणावरून रोहित फाळके घराकडे पळून गेला. यानंतर विशाल फाळके याच्यासह टोळीने त्याचा पाठलाग केला. त्याच्या घराजवळ धारदार शस्त्राने त्याच्यावर सपासप वार केले. त्याच ठिकाणी रोहितचे वडील संजय व आई जयश्री यांनाही मारहाण करण्यात आली. उपचारादरम्यान रोहित याचा मृत्यू झाला. अन्य जखमींची प्रकृती आता स्थिर आहे.
या घटनेनंतर अवघ्या 24 तासाच्या आत मुख्य संशयित आरोपी विशाल फाळके याला पुणे येथून जेरबंद करण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. तर त्यानंतर लगेचच अनिकेत संतोष खुळे, आकाश महिपत मळेकर, गणेश प्रकाश मळेकर व एक अल्पवयीन आरोपी अशा पाच जणांना याप्रकरणी आतापर्यंत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तर अजूनही तीन ते चार आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
दरम्यान, विशाल फाळके हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे विशाल फाळकेसह त्याच्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करावी. खुनात सहभागी असणाऱ्या सर्वांना फाशीची शिक्षा द्यावी. आरोपींचे कॉल डिटेल्स तपासावेत. त्यातून निष्पन्न होणाऱ्या व्यक्तींवरही गुन्हा दाखल करावा. विशाल फाळके याला न्यायालयाने वॉरंट काढले होते, मात्र तासगाव पोलिसांनी ते संबंधिताला बजावले नाही. त्यामुळे याप्रकरणी दोषी असणाऱ्या पोलिसांवर ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करावा, अशा विविध मागण्यांसाठी कालपासून मृत रोहित याच्या कुटुंबीयांनी तासगाव पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणास आज आमदार रोहित पाटील यांनी भेट दिली. आंदोलनकर्त्यांना कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. शिवाय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याशी चर्चा केली.