जत : जत शहरातील मध्यवर्ती बसस्थानक आवारात एका तरुणाला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. त्यांच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा आज सोमवारी दुपारी २.३०च्या सुमारास मृत्यू झाला. चंद्रकांत इराप्पा वाघमारे (वय ३९, रा. उमराणी, ता. जत) असे मृताचे नाव असून, शनिवारी ७ वाजता ही घटना घडली. याबाबत जत पोलिस ठाण्यात आई रेणुका इराप्पा वाघमारे (वय ६०, रा. उमराणी, ता. जत) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दुपारीच सांगोला तालुक्यातील घेरडी व जत तालुक्यातील अंतराळ येथून दोन संशयित चंद्रकांत वाघमारे आरोपीना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत जत पोलिसांत आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. याबाबात पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, चंद्रकांत वाघमारे हा मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. वरील संशयित आरोपी व चंद्रकांत हे तिघे मित्र होते.
शुक्रवारी ता. २६ रोजी रात्री १२ च्या सुमारास जत बसस्थानकात थांबलेले असताना तिघांमध्ये वाद झाला. यामध्ये संशयित आरोपीनी चंद्रकांत यांना बेदम मारहाण केली. दरम्यान, मयत खाली असणाऱ्या फरशीवर पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला रात्रीच जत ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी मिरजेला पाठविले होते. आज त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी पंचनामा करून दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. रात्री जत पोलिस ठाण्यात आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अधिक तपास जत पोलिस करत आहेत.