जत : वाचनामुळे मानवाचे मन मेंदू आणि मनगट बळकट होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी नेहमी पुस्तके वाचली पाहिजेत, पण आज विविध समाज माध्यमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड कमी होत चालली आहे. आपली विचारांची समृद्धी वाढवायची असेल तर आपला जास्तीत जास्त वेळ वाचनात घालवीला पाहिजे. पण आजचा विद्यार्थी समाज माध्यमांच्या महाजालात अडकला आहे, म्हणून महाराष्ट्र राज्याच्या वतीने 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत “वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ ही नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे, तरी यामध्ये सर्वांनी सहभागी होऊन वाचनाची आवड जोपासावी असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांनी केले.
ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालयीन समिती प्रमुख प्रा.कुमार इंगळे हे होते. यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.शिवाजी कुलाल व एक तास ग्रंथालयात या उपक्रमाचे समन्वयक प्रा.अनिल लोखंडे उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना ग्रंथालयीन समितीचे प्रमुख प्रा.कुमार इंगळे म्हणाले की, वाचनामुळे माणसाच्या मनाची अनुभव समृद्धी वाढते. वाचनामुळे आपले मन व बुद्धी सक्षम होते. वाचनामुळे मन आणि बुद्धी सक्षम झाले की, आपण जीवनात यशस्वी होतो. त्यामुळे विद्यार्थ्याने आपली अनुभव समृद्धता वाढविण्यासाठी जास्तीत जास्त पुस्तके वाचली पाहिजेत, असे सांगून त्यांनी वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत विविध आयोजित कार्यक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अनिल लोखंडे यांनी तर शेवटी आभार प्रदर्शन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.शिवाजी कुलाल यांनी केले. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी, मुक्तपीठ व एक तास ग्रंथालयात या उपक्रमाचे सर्व समन्वयक, सदस्य व प्राध्यापक उपस्थित होते.