जतच्या भगिनी निवेदिता बालगृहातील ‘साक्षी ‘वर बरसल्या जोडलेल्या माणुसकीच्या अक्षता | दानशुरांच्या मदतीतून सुंदर विवाह सोहळ्याची झाली नोंद

0
869

जत : पित्याचे छत्र हरविलेल्या आणि फक्त आणि फक्त केवळ आईचा आधार असलेल्या चार वर्षे वयाच्या साक्षी पाटील या चिमुकलीला सांगलीच्या भगिनी निवेदिता प्रतिष्ठानच्या नसीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जत येथील भगिनी निवेदिता बालगृहाच्या माध्यमातून माणुसकीचे छत्र लाभले.संस्थेतीलच रेखा गरड,मीनाक्षी काटकर,ललिता बनसोडे,मुलीची आई अर्चना पाटील यांच्या व बालगृहाच्या प्रेमळ पंखाखाली लहानाची मोठी झाली.संस्थेने तीचे १२ वी पर्यंत शिक्षण केले.

अनेकांची मायेची सावली आणि आधारवड असलेल्या भगिनी निवेदिता संस्थेच्या नसीम शेख यांच्या माध्यमातून व संस्थेच्या सहकार्यातून  काही अनाथ,एक पालकत्व असलेल्या  सुमारे २५ मुलींच्या भावी आयुष्यातील जीवनाला वेगळी दिशा,संस्कार देत त्यांच्या वैवाहिक आयुष्याला दिशा दिली आहे.या २५ मुलींचे विवाह होऊन सर्वजण त्यांच्या जीवनात आनंदी आहेत.जतच्या बालगृहातील पूजा साखळकर तसेच सुजाता पाटील यांचाही विवाह सोहळा जत येथे पार पडला होता.यातील सुजाता पाटील हीचे शिक्षण व विवाहाचे कर्तव्य माजी आमदार विक्रमदादा सावंत यांचे बंधू चंद्रसेन सावंत यांनी केले होते.साक्षी पाटीलच्या विवाहाचे जबाबदारीचे शिवधनुष्य मात्र नसीम शेख यांनी उचलत लग्न ठरवले.

गेल्याच आठवड्यात २६डिसेंबरला तिचा विवाह कोल्हापूर जिल्ह्यातील कोंडिग्रे या गावी प्रल्हाद दिलीप पाटील यांचे सुपुत्र निखिल यांच्याशी संपन्न झाला.या विवाह सोहळ्याला मानुसकीची जोडलेली नाती असणारी सर्व मंडळी उपस्थित होती.विवाह सोहळ्याला साहित्यरूपी मदतीतून एक सुंदर गोडवा तिच्या आयुष्यात नोंदला गेला.सर्वांच्या प्रेमाचे ,संस्काराचे पंखात बळ भरून  संसाररूपी प्रवासात तीने प्रस्थान केले आहे. शिवाय पती ही होतकरू मिळालेला असून तिच्या आयुष्यात ‘निखिल ‘ योग जुळून आला आहे.विवाह सोहळ्याला संस्थेतील बबन गरड व त्यांच्या पत्नी रेखा गरड यांनी कन्यादान केले.तर मामाची जबाबदारी भागवत काटकर यांनी घेतली.या सोहळ्याला सांगली येथील भगिनी निवेदिता प्रतिष्ठानच्या  अध्यक्षा निताताई दामले,वर्षाताई विक्रम सावंत,माजी नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर ,सीमाताई पाटील,अनुराधा संकपाळ,सुजाता दुगानी,मेघा शिंदे आदींची उपस्थिती होती .

 खाकी वर्दीतील माणुसकीने दिल्या मदतीच्या अक्षता 

या अनोख्या विवाह सोहळ्याला जतचे तत्कालीन पोलिस निरीक्षक यांनी तसेच  सध्या जत पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी या दोघांनीही दातृत्वाची दानत दाखवत नाव जाहीर न करण्याच्या अटीवर मदत केली.तसेच शेगाव येथील जयश्री जाधव, अनुप्रिया वाघमारे,सिद्धनाथ खोत , जत टीचर्स इलेव्हन क्रिकेट क्लब, वाळेखिंडीचे जगन्नाथ यादव यांनीही या सोहळ्यासाठी मदतीचे महत्वपूर्ण योगदान दिले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here