आदित्य येसुगडे याची महाराष्ट्राच्या कब्बडी संघात निवड | स्वराज्य फाउंडेशनचा खेळाडू : तासगावच्या शिरपेचात मानाचा तुरा

0
140

    येथील स्वराज्य फाउंडेशनचा खेळाडू आदित्य शीतल येसुगडे - पाटील याची 19 वर्षाखालील कुमार गटातील कब्बडी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. या गटातील राष्ट्रीय पातळीवरील सामने उत्तराखंड येथे होणार आहेत. त्याच्या महाराष्ट्राच्या संघातील निवडीमुळे तासगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

   आदित्य पाटील हा तासगाव येथील शिवनेरी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचा सदस्य आहे. वयाच्या दहाव्या वर्षापासून तो कबड्डी या क्षेत्रात खेळत आहे. त्याचे या खेळातील प्राविण्य पाहून वडिलांनी त्याला याच क्षेत्रात वाव देण्याचे ठरवले. सुरुवातीला तो येथील दर्यावर्दी किसान व्यायाम मंडळामध्ये खेळत होता. या मंडळात खेळत असताना त्याने तालुका व जिल्हा पातळीवरील अनेक सामने गाजवले आहेत. शिवाय शालेय शिक्षण पूर्ण करत असताना शालेय क्रीडा स्पर्धांमध्येही त्याने नावलौकिक मिळवला होता.

    गेल्या दोन वर्षांपासून तो तासगाव येथील स्वराज्य फाउंडेशन या संघात खेळत आहे. तसेच गेल्या चार वर्षांपासून तो सांगली जिल्ह्याच्या कबड्डी संघात कुमार गटात चमकत आहे. 'लेफ्ट रायडर' म्हणून त्याने जिल्ह्याच्या संघात छाप पडली होती.

  दरम्यान यावर्षीच्या कुमार गटातील निवड चाचणी स्पर्धा सांगलीवाडी येथे नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत जिल्ह्याच्या संघातून खेळताना आदित्य याने आपली चुणूक दाखवली. त्याला या स्पर्धेत 'प्लेयर ऑफ द डे' हा किताबही मिळाला. 19 वर्षाखालील राज्याच्या संघात स्थान मिळवण्याच्या ध्येयाने तो या स्पर्धेत खेळत होता. 

  निवड समितीवर त्याने आपल्या खेळाच्या जोरावर छाप पडली. आदित्यच्या खेळ पाहून निवड समितीने त्याची महाराष्ट्राच्या संघात निवड केली आहे. पुढील राष्ट्रीय पातळीवरील कबड्डी स्पर्धा उत्तराखंड येथे पार पडणार आहेत. तासगावचा खेळाडू या राष्ट्रीय स्पर्धेत चमकणार आहे. 

   आदित्य हा शिवनेरी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष शितल पाटील यांचा चिरंजीव आहे. सध्या तो वसंतदादा पाटील महाविद्यालय, तासगाव येथे शिक्षण घेत आहे. त्याच्या महाराष्ट्राच्या संघातील निवडीमुळे तासगावच्या शिरपेचात मानाचा तुरारोला गेला आहे.

   त्याच्या निवडीसाठी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, भाजप किसान मोर्चाचे महामंत्री संदीप गिड्डे - पाटील, समीर चंदुरे यांनी मार्गदर्शन केले. त्याला स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, मार्गदर्शक यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here