येथील गणेश कॉलनीतील ऍड. सुखदेव कोरटे यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. कटावणीच्या सहाय्याने दार उघडून घरातील 40 हजार रुपयांची रोकड व अन्य सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे 1 लाख 5 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. या चोरीमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
ऍड. सुखदेव कोरडे हे आपल्या कुटुंबासह येथील गणेश कॉलनीत राहतात. त्यांचे मूळ गाव कौलगे (ता. तासगाव) आहे. ते येथील न्यायालयात वकिलीचा व्यवसाय करतात. दि. 30 डिसेंबर रोजी कोरटे हे आपल्या कुटुंबासह कौलगे या आपल्या मूळ गावी गेले. त्याठिकाणी वडिलांची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना तासगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना 30 डिसेंबर रोजीच रात्री त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान गेल्या आठवड्यापासून कोरटे कुटुंबीय आपल्या मूळ गावी कौलगे येथेच होते. आज सकाळी ऍड. सुखदेव कोरटे हे आपल्या गणेश कॉलनीतील घरी आले. त्यावेळी लोखंडी ग्रीलचा दरवाज्याची कडी अर्धवट निघालेली दिसली. तर घराचा मुख्य दरवाजाही उघडा दिसला. त्यामुळे त्यांना आपल्या घरी चोरी झाल्याचा संशय आला. त्यांनी याबाबत तासगाव पोलिसांना माहिती दिली.
तासगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांच्यासह पोलिसांनी तातडीने गणेश कॉलनीतील कोरटे यांच्या घराकडे धाव घेतली. यावेळी घराची पाहणी केली असता घरातील 40 हजार रुपयांची रोकड तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे 1 लाख 5 हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे लक्षात आले.
यानंतर पोलिसांनी सांगली येथून श्वान पथकाला पाचारण केले. मात्र श्वान गणेश कॉलनीत आसपास घुटमळले. दरम्यान विट्याचे पोलीस उपअधीक्षक विपुल पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या चोरीचा कसून तपास करण्याच्या सूचना त्यांनी तासगाव पोलिसांना दिल्या.
…म्हणून लाखो रुपयांचे दागिने वाचले..!
ऍड. सुखदेव कोरडे यांच्या वडिलांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालवली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान 30 डिसेंबर रोजी ते आपल्या वडिलांना घेऊन कौलगे या गावी गेले. जाताना त्यांच्या पत्नीने घरातील दीड तोळ्याचा नेकलेस, चार तोळ्याचा राणीहार, दोन तोळ्याचे मंगळसूत्र, दोन तोळ्याचे ब्रासलेट व चेन असे सर्व दागिने घाईगडबडीत एका पिशवीत घेतले होते. जर हे दागिने तासगाव येथील घरातच राहिले असते तर चोरट्यांनी यावर डल्ला मारला असता. पण कोरटे यांच्या पत्नीने हे सर्व दागिने आपल्यासोबत पिशवीत घेतल्याने लाखो रुपयांचे दागिने चोरी होण्यापासून वाचले, असेच म्हणावे लागेल.