छत्रपती संभाजीनगर :
छत्रपती संभाजीनगर शहराला हादरवून टाकणारी आणि संताप उफाळून आणणारी घटना समोर आली आहे. शहरातील गजबजलेल्या नागेश्वरवाडी परिसरात मध्यरात्री एका तरुणीला भररस्त्यात बेदम मारहाण करत तिला केस धरून फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संपूर्ण घटनेचे थरारक दृश्य रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, व्हिडिओ व्हायरल होताच शहरात एकच खळबळ उडाली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. व्हायरल सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण एका तरुणीसोबत अमानुषपणे वागताना स्पष्टपणे दिसत आहे. तो तरुण तिला मारहाण करत असून, बळजबरीने रस्त्यावरून ओढत नेत असल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या झटापटीदरम्यान तरुणी स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही दिसते; मात्र आरोपी तरुण तिच्यावर हल्ला करणे थांबवत नाही. काही वेळानंतर ते दोघेही त्या ठिकाणाहून निघून गेल्याचे फुटेजमध्ये दिसून येते.
या गंभीर घटनेबाबत क्रांती चौक पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता, याप्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी स्वतःहून तपास सुरू केला आहे. संबंधित तरुण आणि तरुणीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असून, नेमका प्रकार काय आहे याचा शोध घेतला जात आहे.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये, विशेषतः पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, मध्यरात्री शहरात अशा प्रकारे घडणाऱ्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संबंधित आरोपीवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या प्रकरणात पोलीस पुढे काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
टीप: बातमीतील व्यक्तीचा फोटो मूळ (Original) असून, सादरीकरण व ग्राफिक्ससाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.




