कर्जत : कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती एच. डांगरे आणि न्यायमूर्ती आशिष एस. चव्हाण यांच्या खंडपीठाने शुक्रवारी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. मृत्युदंडाच्या शिक्षेविरोधातील अपिले आणि शिक्षेच्या पुष्टीकरणाची कार्यवाही सुरू असताना ही पाहणी करण्यात आली.
न्यायमूर्तींनी घटनास्थळ, परिसरातील रस्ते, साक्षीदारांची संभाव्य ठिकाणे तसेच पीडितेची सायकल आणि कपडे आढळलेल्या ठिकाणांमधील अंतराची पाहणी केली. साक्षीदारांनी आरोपींच्या हालचाली पाहिल्याच्या जबाबांच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष भौगोलिक परिस्थिती समजून घेण्यासाठी ही पाहणी करण्यात आली.
फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३१० अंतर्गत झालेल्या या पाहणीचा उद्देश नवीन पुरावा गोळा करणे नसून, न्यायालयासमोर आधीच नोंदवलेल्या साक्षी व कागदपत्रांचा घटनास्थळाच्या परिस्थितीशी मेळ घालणे हा आहे. प्राथमिक पाहणीनंतर काही बाबी स्पष्ट करण्यासाठी न्यायमूर्तींनी पुन्हा परिसराची पाहणी केली.
अंतिम युक्तिवादापूर्वी पाहणी
या प्रकरणातील अंतिम युक्तिवादापूर्वी ही पाहणी झाली. पाहणीदरम्यान तपास अधिकारी, सरकारी पक्षाचे प्रतिनिधी आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून न्यायमूर्तींनी माहिती घेतली. पाहणीनंतर न्यायालयाच्या निरीक्षणांच्या अनुषंगाने दोन्ही पक्षांना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळणार आहे.
२०१६ मधील घटना
१३ जुलै २०१६ रोजी कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या घटनेनंतर राज्यभर आंदोलने झाली होती. नोव्हेंबर २०१७ मध्ये अहमदनगर विशेष न्यायालयाने तीन आरोपींना दोषी ठरवून मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. त्यानंतर उच्च न्यायालयात अपिले दाखल झाली. त्यापैकी एका दोषीचा २०२३ मध्ये कारागृहात मृत्यू झाला असून उर्वरित आरोपींच्या अपिलांवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
पाहणीच्या पार्श्वभूमीवर कोपर्डी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.




