विश्रामबाग परिसरात धडक कारवाई
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधात आक्रमक भूमिका घेत सांगली-मिरज रोडवरील विश्रामबाग चौक (जुना जकात नाका) व दांडेकर बाजार समोरील अनेक वर्षांपासून उभारण्यात आलेल्या ६७ अनधिकृत खोक्यांवर धडक कारवाई केली. महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या थेट निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या या मोहिमेत सर्व अतिक्रमणे पूर्णपणे हटवून मुख्य रस्ता मोकळा करण्यात आला.दरम्यान काहीकाळ तणावाची स्थिती होती.
सदर कारवाईपूर्वी नगररचना विभागातर्फे संबंधित खोकीधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अंतर्गत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून विहित मुदत देण्यात आली होती. मुदतीत अतिक्रमण न काढल्यामुळे अखेर प्रशासकीय बळाचा वापर करून निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून कारवाईचे संचलन केले. अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपायुक्त स्मृती पाटील, अधीक्षक मद्रासी, मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर, मुख्य सुरक्षा अधिकारी मुकेश मिरजकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात सहभागी झाले होते.
अनेक वर्षांपासून या अनधिकृत खोक्यांमुळे सांगली-मिरज मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत होती. कारवाईनंतर रस्ता रुंद झाल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या धाडसी भूमिकेचे स्वागत केले आहे. आयुक्त सत्यम गांधी यांनी इशारा देत सांगितले की, शहराच्या नियोजित विकासात अतिक्रमणे मोठा अडथळा असून सांगली, मिरज व कुपवाड परिसरातील प्रमुख रस्त्यांवरील सर्व अनधिकृत बांधकामांवर पुढेही कोणत्याही दबावाशिवाय कठोर कारवाई केली जाईल. नोटिसा मिळालेल्या संबंधितांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावे; अन्यथा निष्कासनाचा खर्च वसूल करून साहित्य व यंत्रसामग्री जप्त करण्यात येईल.




