जतच्या विकासाला १५ कोटींचे बळ; सात ठिकाणी साकारणार उद्याने | नगरपरिषदेला पाच कोटींचा विशेष निधी; तालुक्यातील विविध विकासकामांसाठी आणखी दहा कोटी मंजूर

0
4

जत, ता. १८ : जत शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने एकूण १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये जत नगरपरिषदेला सात उद्यानांच्या निर्मिती व विकासासाठी पाच कोटी रुपये, तर प्रादेशिक पर्यावरण विकास योजनेअंतर्गत तालुक्यातील विविध विकासकामांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने ६ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ‘नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान’ या योजनेतून जत नगरपरिषदेसाठी पाच कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे.

या निधीतून शहरातील सात ठिकाणी उद्यानांची निर्मिती व सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये विठ्ठलनगर, महात्मा बसवेश्वर चौक, भूमी अभिलेख कार्यालयासमोरील परिसर, यशवंतनगर, विजयतानगर, घाणेश्वरी नगर आणि चैतन्य उद्यान यांचा समावेश आहे. प्रत्येक उद्यानाच्या विकासासाठी ५० ते ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या उद्यानांमुळे शहरातील नागरिकांना विरंगुळा, मनोरंजन आणि मुलांसाठी खेळण्याच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार केलेल्या नियोजनबद्ध ब्ल्यू प्रिंटचा हा महत्त्वाचा भाग असल्याचे नगराध्यक्ष आरळी यांनी सांगितले. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे निधी मंजूर झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

तालुक्यातील गावांनाही विकास निधी

दरम्यान, प्रादेशिक पर्यावरण विकास योजनेअंतर्गत जत तालुक्यातील विविध विकासकामांसाठी दहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामध्ये जत शहरातील श्री यल्लमा देवी मंदिर परिसरातील सभामंडपाच्या कामासह काराजंगी, बेवनूर, बालगाव, वज्रवाड, येळदरी, संख, कोळगिरी, दरीबडची आणि कोनबोबलाद या गावांतील विकासकामांचा समावेश आहे.

शहर आणि ग्रामीण भागासाठी एकाच वेळी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने जतच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास नगराध्यक्ष डॉ. आरळी यांनी व्यक्त केला. निधीच्या माध्यमातून नियोजित कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी उपनगराध्यक्ष विक्रम ताड, गौतम ऐवळे, पापा कुंभार, अण्णा भिसे, प्रमोद हिरवे, मिथुन भिसे, परशुराम मोरे, संतोष पट्टणशेट्टी, सोनुले, अनिल पाटील यांच्यासह भाजपचे नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here