शेततलावात बुडून माय-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; डफळापूरमध्ये हळहळ

0
1


जत : तालुक्यातील डफळापूर येथील भोसले मळ्यात शेततलावात बुडून आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी सकाळी घडली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये सुशिला विठ्ठल पडोळकर (वय ४५) व त्यांचा मुलगा अनिल विठ्ठल पडोळकर (वय २८, रा. अकोळ, ता. निपाणी, जि. बेळगाव) यांचा समावेश आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पडोळकर कुटुंब मेंढपाळ असून मागील महिनाभरापासून जत तालुक्यातील विविध भागात मेंढ्या चारण्यासाठी वास्तव्यास होते. मंगळवारी रात्री त्यांनी डफळापूर येथील दिलीप भोसले यांच्या शेतात मेंढ्यांचा मुक्काम केला होता.


बुधवारी सकाळी सुमारे नऊच्या सुमारास सुशिला पडोळकर या पाणी आणण्यासाठी शेततलावावर गेल्या असता त्यांचा पाय घसरून त्या पाण्यात पडल्या. आईला वाचवण्यासाठी मुलगा अनिल पडोळकर याने तत्काळ तलावात उडी घेतली; मात्र गाळ व पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले.


घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन दोघांना बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.


दोघांचेही मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून, नंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात सिध्दाप्पा पडोळकर यांनी वर्दी दिली आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here