कोल्हापूर, दि. २६ : शेतकऱ्यांना घरबसल्या मोबाईलवरून खत उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने नवे ॲप विकसित केले असून, त्याचा पायलट प्रकल्प छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे.
या ॲपद्वारे शेतकरी परिसरातील खत विक्रेत्यांकडील उपलब्ध साठा मोबाईलवर पाहू शकणार आहेत. आवश्यक खत ऑनलाईन बुक केल्यानंतर ते तीन दिवसांसाठी संबंधित शेतकऱ्याच्या नावावर राखीव ठेवले जाणार आहे. त्यानंतर QR कोडद्वारे थेट विक्रेत्याकडून खत खरेदी करता येणार आहे.
या उपक्रमामुळे खतासाठी होणारी धावपळ, रांगा आणि उपलब्धतेबाबतचा संभ्रम कमी होण्यास मदत होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी दिली.




