डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ५९ लाखांची फसवणूक | आंतरराज्य टोळीतील दोघांना अटक

0
1

सांगली : पोलिस असल्याचे सांगत डिजिटल अरेस्टची भीती दाखवून तासगाव येथील एका नागरिकाची तब्बल ५९ लाख ९ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोघांना सांगली सायबर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून मोबाईल, सिम कार्ड, डेबिट-क्रेडिट कार्ड, पासबुक, चेकबुकसह विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे.

अबु हुसेन समसुल आलम (वय ३८, रा. हिंग आयनोशिप, कोंढवा रोड, हडपसर, पुणे, मूळ रा. पश्चिम बंगाल) तसेच सुशिल अकिल राम (वय २४, रा. मगपथा सिटी, पुणे, मूळ रा. पश्चिम बंगाल) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावळज येथील अण्णासाहेब पाटील यांना ८ ते १६ जानेवारीदरम्यान फोन करून आरोपींनी आपण पोलीस, सीबीआय, इन्कम टॅक्स किंवा अन्य केंद्रीय तपास यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवले. त्यानंतर व्हॉट्सअॅपवर पोलिस अधिकाऱ्यांचे फोटो लावून व्हिडिओ कॉलद्वारे अटक करण्याची धमकी देण्यात आली. या भीतीपोटी फिर्यादींकडून ५९ लाख ९ हजार रुपये उकळण्यात आले होते.

या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सांगली सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपींच्या खात्यावर २४ लाख ६० हजार रुपयांची रक्कम जमा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.

आरोपींकडून ४ मोबाईल, विविध बँकांची १८ डेबिट-क्रेडिट कार्डे, २४ चेकबुक, ६ पासबुक, ६ सिमकार्ड, रिकामे पाकीट तसेच आधार व पॅनकार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक स्नेहा गिरी, सहाय्यक निरीक्षक रुपाली बोबडे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

फोटोओळ : डिजिटल अरेस्टची भीती दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दोघांना सांगली सायबर पोलिसांनी अटक केली.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here