केसरेकर दाम्पत्य दुहेरी खूनप्रकरणी १३ दिवसांत दोषारोपपत्र

0
1

कुपवाड : विघ्नहर्ता कॉलनीत कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या मनीषा केसरेकर व मोहन केसरेकर दाम्पत्याच्या दुहेरी खूनप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या १३ दिवसांत दोषारोपपत्र दाखल केले. आरोपी फरीद शेख याने स्वातंत्र्यदिनी चाकू व हातोड्याने दाम्पत्यावर हल्ला केला होता. गंभीर जखमी झालेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिक, नातेवाईक आणि विविध संघटनांनी आरोपीवर कठोर कारवाई तसेच खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालविण्याची मागणी केली होती. प्रशासनाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीचे बेकायदेशीर घरही पाडले. मुस्लिम समाजानेदेखील आरोपीला कठोर शिक्षा मिळावी, अशी भूमिका घेतली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रंजन शर्मा यांनी १५ दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपास वेगाने पूर्ण करून निर्धारित मुदतीच्या दोन दिवस आधीच, म्हणजे १३ दिवसांत, पुराव्यांसह दोषारोपपत्र दाखल केले. या कारवाईमुळे पुढील न्यायालयीन प्रक्रियेला वेग मिळण्याची शक्यता आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here