चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून; पतीला जन्मठेप

0
1

सांगली : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याप्रकरणी मांगले (ता. शिराळा) येथील मंगेश चंद्रकांत कांबळे याला जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच त्याला एकूण १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ईश्वरपूर येथील जिल्हा न्यायाधीश देविदास एच. केळूसकर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली.

ही घटना २७ मार्च २०२५ रोजी मांगले येथे आरोपीच्या राहत्या घरी घडली होती. मंगेश कांबळे याने पत्नी प्राजक्ता मंगेश कांबळे हिच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा ओढणीने गळा आवळून खून केला. विशेष म्हणजे त्यांचा मुलगा शिवम कांबळे याने ही घटना प्रत्यक्ष पाहिली होती.

खून केल्यानंतर आरोपीने प्राजक्ता यांचा मृतदेह घरातील पत्र्याच्या पेटीत ठेवला. त्यानंतर पेटीचे दोन्ही दरवाजे बंद करून खोलीला कुलूप लावून आरोपी तेथून निघून गेला. याप्रकरणी शिराळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे १६ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. मयताची आई व फिर्यादी रंजना अर्जुन चांदणे, प्रत्यक्षदर्शी मुलगा शिवम कांबळे, पंच व अन्य साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक मारुती बनसोडे, डॉ. अनिरुद्ध सतीश काकडे आणि तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांच्या साक्षी-पुराव्यांमुळे सरकार पक्षाची बाजू भक्कम झाली.

आरोपीने पती म्हणून असलेली जबाबदारी पार पाडण्याऐवजी चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करून पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारे कृत्य केले आहे. त्यामुळे त्याला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद सहायक सरकारी वकील ॲड. सतीश केकणीस यांनी केला.

सरकार पक्षाचा युक्तिवाद आणि उपलब्ध साक्षी-पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने मंगेश कांबळे याला भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) व २३८ अन्वये दोषी ठरवत जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

खटल्याच्या कामी पैरवी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मुद्दसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक शरद जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल उत्तम शिंदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनंदा सुरेश निकम यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here