पलूस : शहरातील गंजीखाना परिसरात कर्जाच्या तगाद्यामुळे पती-पत्नीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. बाळासाहेब मुरलीधर कदम (वय ५८) यांचा सोमवारी (३१ ऑगस्ट) राहत्या घरी मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी उषा बाळासाहेब कदम (वय ४६) यांचा मंगळवारी (१ सप्टेंबर) सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने पलूस शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषा कदम यांनी रविवारी (३० ऑगस्ट) राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना पलूस ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने सोमवारी पुढील उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी सुमारे ६.४५ वाजता त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, बाळासाहेब कदम हे सोमवारी दुपारी सुमारे २.३७ वाजता राहत्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांच्या तोंडातून पांढऱ्या रंगाचा द्रव येत असल्याचे तसेच उग्र वास येत असल्याचे त्यांच्या मुलाने पोलिसांना सांगितले. नातेवाइकांनी त्यांना तातडीने पलूस ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
पती-पत्नीने विषारी औषध प्राशन केल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. दोघांनीही आर्थिक विवंचना आणि कर्जाच्या तगाद्यातून हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दोन्ही मृत्यूंची पलूस पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून वैद्यकीय अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. कर्जाचे व्यवहार, आर्थिक परिस्थिती तसेच अन्य संभाव्य कारणांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.




