उमदी दरोडा प्रकरणी चौघे ताब्यात | १७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

0
2

तिकोंडी-संख मार्गावरील लुटीचा छडा; गावठी कट्टा, काडतूस आणि रोकड जप्त

जत : तिकोंडी ते संख जाणाऱ्या रस्त्यावर तमिळनाडूतील मेंढी व्यापाऱ्याला हत्यारांचा धाक दाखवून ९ लाख रुपयांची लूट केल्याप्रकरणी उमदी पोलिसांनी चौघांना अटक केली. तपासादरम्यान आरोपींकडून १३ लाख रुपये रोख, गावठी कट्टा, जिवंत काडतूस तसेच अन्य साहित्य असा सुमारे १७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आणखी तीन साथीदारांची नावे तपासात निष्पन्न झाली असून, त्यांचा शोध सुरू आहे.

११ सप्टेंबर रोजी पहाटे तिकोंडी-संख मार्गावर तमिळनाडू येथून मेंढ्या खरेदीसाठी आलेल्या व्यापाऱ्याला अडवण्यात आले. हत्यारांचा धाक दाखवत त्याच्याकडील मोबाईल आणि सुमारे ९ लाख रुपये लुटून आरोपी पसार झाले. याप्रकरणी तमिळनाडू राज्यातील एम. रवी यांनी उमदी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती.

घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपास पथकाने तांत्रिक बाबींच्या आधारे तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला. तपासात गणेश बिराप्पा पांढरे (वय २१, रा. मुंजेवस्ती, पांढरेवाडी), शांताराम बसवंत शिंदे (वय ३०, रा. आसंगी तुर्क), गौरव दादासो चौगुले (वय २३) आणि आकाश पाराप्पा नेमाने (वय २३, दोघेही रा. कुलाळवाडी, ता. जत) यांची नावे निष्पन्न झाली.

पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता दरोड्याच्या तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली. आरोपींकडून १३ लाख रुपये रोख रक्कम, गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. याशिवाय दरोड्यात वापरलेल्या अन्य साहित्याचाही तपास सुरू आहे.

या प्रकरणात आणखी तीन साथीदारांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाचा दरोड्याशी संबंध तपासला जात असून, आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का, याचाही तपास केला जात आहे.

उमदी पोलिसांच्या तपासामुळे पहाटेच्या वेळी व्यापाऱ्याला लक्ष्य करून करण्यात आलेल्या दरोड्याचा छडा लागला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

फोटोओळ : उमदी पोलिसांनी दरोडा प्रकरणी ताब्यात घेतलेले आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here