मुंबई, दि. १६ : केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा सेतू कॅम्प’चे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत नागरिकांना ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ आणि ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (स्मार्ट)’ योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक माहिती व मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
महावितरणकडून प्रत्येक तालुका पातळीवर विशेष ‘किओस्क’ उभारण्यात येणार असून, या माध्यमातून ग्राहकांना रूफटॉप सौर ऊर्जा योजनांची माहिती देण्यात येईल. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी तालुका पातळीवर किओस्क उभारण्याचे निर्देश दिले आहेत.
या किओस्कमध्ये सौर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा, अर्जाची प्रक्रिया कशी पूर्ण करावी, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून देण्यात येणार आहे. त्यामुळे सौर ऊर्जा योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना अर्ज प्रक्रियेबाबत येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.
विशेष म्हणजे या कॅम्पमध्ये विविध बँकांचे प्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना सौर यंत्रणेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याबरोबरच आवश्यक बँक कर्जासाठीही घटनास्थळी अर्ज करता येणार आहे. सौर यंत्रणा बसविण्याची प्रक्रिया, योजना, अर्ज पद्धती तसेच कर्ज सुविधेबाबतची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे.
‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ आणि ‘स्मार्ट’ योजनेच्या माध्यमातून घरांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी सेवा सेतू कॅम्पमध्ये सहभागी होऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून आवश्यक माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सौर ऊर्जा योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी या कॅम्पचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा, असे महावितरण प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.



