मिरज : मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर नव्याने उभारण्यात येत असलेली कमान सोमवारी दुपारी अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. कमानीचा स्लॅब कोसळून त्याखाली कामगार अडकले. या दुर्घटनेत सहा ते सात कामगार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेनंतर रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या पाच ते सहा कामगारांना बाहेर काढण्यात यश आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रशासनाकडून त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिस, रुग्णालय प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या सहाय्याने कोसळलेला स्लॅब व बांधकामाचा ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून बांधकामाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
फोटोओळ : मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर बांधण्यात येत असलेली कमान कोसळल्यानंतर ढिगारा हटविताना बचाव पथक व जेसीबी.




