बेळोंडगीचा ओव्हरलोड एजी फिडर विभाजित करा

0
3

ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

उमदी : गावासाठी असलेल्या ओव्हरलोड एजी फिडरचे विभाजन करून स्वतंत्र नवीन एजी फिडर सुरू करावा, यासह विविध मागण्यांसाठी माजी पंचायत समिती सदस्य कल्लाप्पा सिद्धण्णा हलकुडे यांनी प्राणांतिक उपोषणाची नोटीस दिली आहे.

बेळोंडगी एजी फिडरवर मोठ्या प्रमाणात वीजभार असल्याने शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा मिळत नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. शासनाच्या नियमानुसार आठ तास तीन फेज वीजपुरवठा अपेक्षित असताना प्रत्यक्षात रात्री-अपरात्री केवळ दोन-तीन तास तुकड्यांत वीज मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वीज सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच पुरवठा खंडित होत असल्याने शेतीपंप चालविण्यात अडचणी येत आहेत.

सन १९७२ पासूनच्या जुन्या व जीर्ण वाहिन्यांमुळे वारंवार बिघाड होत असून, कमी दाबामुळे गेल्या तीन महिन्यांत शेतकऱ्यांच्या मोटारी जळाल्याचा दावा करण्यात आला आहे. वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे पिकांचे नुकसान होत असल्याने नुकसानभरपाईची मागणीही करण्यात आली आहे.

खासदारांच्या आमसभेत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर १५ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, चार महिने उलटूनही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप आहे. नवीन फिडरसाठी सुमारे ४० पोल उभारण्यात आले असून आणखी ३० पोल, कंडक्टर, बे व ब्रेकरची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here