मुंबई : राज्यातील प्रशासकीय यंत्रणा अधिक सुलभ आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने महसूल विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बारामती, पंढरपूर, दापोली आणि नागपूर ग्रामीण येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये ४७ नवीन अप्पर तहसील कार्यालये स्थापन करण्यात येणार आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा प्रशासकीय बदल करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. वाढती लोकसंख्या, जिल्हा मुख्यालयापासूनचे भौगोलिक अंतर, वाढते नागरीकरण आणि शासकीय कार्यालयांवरील कामाचा वाढता ताण लक्षात घेऊन नवीन कार्यालयांची निर्मिती केली जाणार आहे.
पंढरपूरमध्ये अपर जिल्हाधिकारी कार्यालय
पंढरपूर येथे मंजूर करण्यात आलेल्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, माढा, माळशिरस, करमाळा आणि मोहोळ या सात तालुक्यांचा समावेश असेल. या भागातील नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी सोलापूर जिल्हा मुख्यालय गाठावे लागते. नवीन कार्यालयामुळे त्यांचा वेळ आणि प्रवासाचा त्रास कमी होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, नव्या प्रशासकीय रचनेमुळे महसूल विभागाशी संबंधित विविध सेवा नागरिकांना स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. नवीन कार्यालयांसाठी आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदस्थापना शासनस्तरावरून केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
बारामती, पंढरपूर, दापोली आणि नागपूर ग्रामीण या चार ठिकाणी अपर जिल्हाधिकारी कार्यालये आणि २१ जिल्ह्यांत ४७ अप्पर तहसील कार्यालये सुरू झाल्यानंतर महसूल प्रशासनाचे विकेंद्रीकरण होणार आहे.




