भूमी अभिलेख कार्यालयात ५० हजारांची लाच | जयंतराव पाटील विरुद्ध सदाभाऊ खोत-भोसले-पाटील वादाला नवा संदर्भ

0
1

ईश्वरपूर : महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवरून काही दिवसांपूर्वी रंगलेला राजकीय वाद आता भूमी अभिलेख कार्यालयातील ५० हजार रुपयांच्या लाच प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत भूमी अभिलेख कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

आमदार जयंतराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वी महसूल विभागाच्या कार्यक्रमात ‘कार्यपद्धती बदला, भ्रष्टाचार थांबवा’, असा इशारा दिला होता. त्यांच्या या भूमिकेवर आमदार सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांची बाजू घेतली होती. अधिकारी हे कोणाचे गुलाम नसल्याची भूमिका त्यांनी मांडली होती.

या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख कार्यालयातील लाचखोरीची कारवाई झाल्याने राजकीय चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

तक्रारदाराच्या वडिलांच्या नावावरील प्रॉपर्टी कार्डवरील क्षेत्र दुरुस्तीचे काम प्रलंबित होते. हे काम करून देण्यासाठी लाचेची मागणी झाल्याची तक्रार १९ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यानंतर २१ सप्टेंबर रोजी मागणीची पडताळणी करण्यात आली.

मंगळवारी दुपारी भूमी अभिलेख कार्यालयात सापळा रचण्यात आला. यावेळी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना परिरक्षण भूमापक सोनाली सचिन आवटी (४७, रा. आष्टा) आणि मुख्यालय सहाय्यक सुनील गणपती पाटील (४८, रा. कोडोली, ता. पन्हाळा) यांना सांगली एसीबीच्या पथकाने पकडले.

या कारवाईनंतर प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवरून झालेल्या पूर्वीच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांना नवा संदर्भ मिळाला आहे. मात्र, एसीबीची कारवाई विशिष्ट तक्रार आणि पडताळणीच्या आधारे झालेली असल्याने तिचा थेट संबंध कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या भूमिकेशी जोडता येणार नाही.

दरम्यान, दोन्ही कर्मचाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार पुढील प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करीत आहे. या कारवाईनंतर ऊरूण-ईश्वरपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here