‘लै नुकसान झालंय साहेब…’ | शेतकरी ढसाढसा रडला; फडणवीसांनी दिला धीर

0
0

लातूर : दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जाऊ गावातील एका शेतकऱ्याने पीक नुकसानीची व्यथा मांडताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. शेतकऱ्याची अवस्था पाहून फडणवीस यांनी त्याला जवळ घेत धीर दिला. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस बुधवारी लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यावर होते. सकाळी सुमारे ११ वाजता त्यांनी लातूर जिल्ह्यातील जाऊ गावाला भेट देऊन शेतातील पिकांची आणि पावसाच्या स्थितीची पाहणी केली. यावेळी स्थानिक शेतकऱ्यांशी त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

दुबार पेरणी करूनही पीक नाही

गावातील शेतकऱ्यांनी कमी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. पाऊस वेळेवर न झाल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. मात्र, त्यानंतरही अपेक्षित पाऊस न झाल्याने पिकांची वाढ झाली नाही. काही ठिकाणी उगवलेली पिकेही प्रतिकूल हवामानामुळे खराब झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

यावेळी एका शेतकऱ्याने, ‘साहेब, माझ्याजवळ आता काहीच उरलं नाही. मोठं नुकसान झालंय, काहीतरी करा,’ अशा शब्दांत आपली व्यथा मांडली. परिस्थिती सांगताना त्याला अश्रू अनावर झाले. शेतकऱ्याची अवस्था पाहून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याला जवळ घेत धीर दिला.

लवकरच मदतीची ग्वाही

शेतकऱ्यांच्या नुकसानीची शासनाकडून दखल घेतली जात असून, संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे फडणवीस यांनी सांगितले. शेतकऱ्यांना या संकटात वाऱ्यावर सोडले जाणार नाही. नुकसान भरून काढण्यासाठी लवकरच भरीव आणि ठोस मदत जाहीर केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

दरम्यान, मुख्यमंत्री स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून परिस्थितीची पाहणी करत असल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. पुढील काळात शासनाकडून कोणत्या स्वरूपाची मदत जाहीर केली जाते, याकडे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

फोटोओळ : लातूर जिल्ह्यातील जाऊ गावात पीक नुकसानीची व्यथा मांडताना भावूक झालेल्या शेतकऱ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळ घेत धीर दिला.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here