नवी दिल्ली : गणेशोत्सवानंतर दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची खरेदी वाढण्याची शक्यता असतानाच ग्राहकांना महागाईचा धक्का बसणार आहे. आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मात्या कंपन्यांनी १ ऑक्टोबरपासून काही उत्पादनांच्या किमती ५ ते ८ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
एसीच्या किमतीत सुमारे ५ ते ८ टक्के, तर काही कंपन्यांकडून वॉशिंग मशिन, फ्रिज आणि एलईडी टीव्हीच्या किमतीत ३ ते ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. ब्ल्यू स्टार, गोदरेज अप्लायन्सेस, हायर, डायकिन आणि सुपर प्लास्ट्रोनिक्स या कंपन्यांनी दरवाढीचे संकेत दिले आहेत. काही कंपन्या अद्याप परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ हे दरवाढीचे प्रमुख कारण असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. तांबे, स्टील आणि क्रूड डेरिव्हेटिव्ह्जच्या वाढलेल्या किमती तसेच परकीय चलन विनिमय दरातील अस्थिरतेचा उत्पादन खर्चावर परिणाम झाला आहे.
याच वर्षातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांची ही तिसरी दरवाढ असल्याचे सांगण्यात येत आहे. सणासुदीच्या काळात दरवाढीचा ग्राहकांच्या मागणीवर परिणाम होण्याची शक्यता असून, बाजारातील उपलब्ध जुन्या स्टॉकमुळे त्याचा परिणाम काही प्रमाणात मर्यादित राहू शकतो.




