कर्नाटक आरोग्य विभागाच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये करजगीतील प्रकार उघड
उमदी : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील जत तालुक्यात बोगस डॉक्टरांकडून बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे प्रकार सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कर्नाटकच्या आरोग्य विभागाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये जत तालुक्यातील करजगी येथील एका मळ्यात सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर गर्भलिंग निदानाच्या व्यवहाराचा पर्दाफाश झाला. या कारवाईमुळे सीमावर्ती भागातील बोगस वैद्यकीय व्यवसायाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी बेकायदेशीर गर्भपातादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेची गंभीर दखल घेत कर्नाटक आरोग्य विभागाने तपास सुरू केला.तपासादरम्यान संशयितांचे धागेदोरे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यापर्यंत पोहोचले. त्यानंतर कर्नाटकातील वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती मिळवण्यासाठी गुप्त पद्धतीने तपास केला.
महिलांच्या वेशात स्टिंग ऑपरेशन
जाडरबोबलाद येथील संशयित एजंट धानाक्का तेली हिच्याशी महिला अधिकाऱ्यांनी सामान्य महिलांच्या वेशात संपर्क साधला. या माध्यमातून संशयितांच्या जाळ्यापर्यंत पोहोचत करजगी येथील एका मळ्यात सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर गर्भलिंग निदानाच्या प्रकाराची माहिती उघड झाली. त्यानंतर संबंधित ठिकाणी कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान संशयित संजय वाघमारे याने अधिकाऱ्यांच्या हाताला हिसडा देत घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे.
कंपाऊंडरकडून डॉक्टरकीचा प्रकार
संजय वाघमारे हा जत तालुक्यातील एका प्रसूती रुग्णालयात कंपाऊंडर तसेच परिचर सहायक म्हणून काम करत असल्याची माहिती तपासात समोर आल्याचे वृत्त आहे. रुग्णालयात काम करताना मिळालेल्या अनुभवाच्या आधारे काही जण वैद्यकीय पात्रता नसतानाही स्वतःला डॉक्टर म्हणून सादर करून दवाखाने चालवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
यापूर्वी सुमारे दहा दिवसांपूर्वी जालीहाळ बुद्रुक येथे गणपती महादेव जाधव या कथित बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात आली होती. तोही कर्नाटकातील विजयपूर येथील रुग्णालयात परिचारक म्हणून काम करत असल्याची माहिती तपासात पुढे आली होती. या घटनांमुळे जत तालुक्यातील सीमावर्ती गावांमध्ये बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसायाचे जाळे कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान
गर्भातील बालकाचे लिंग तपासणे आणि त्याआधारे गर्भपात करणे हा कायद्याने प्रतिबंधित प्रकार आहे. अशा कृत्यांमुळे महिलांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि गर्भपात रोखण्यासाठी आरोग्य विभागाने अधिक प्रभावी तपासणी व कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.
उमदी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता तळेकर यांनी नागरिकांना अशा प्रकारांची माहिती आरोग्य विभागाला देण्याचे आवाहन केले आहे. सीमावर्ती गावांमध्ये संशयास्पद दवाखाने, वैद्यकीय पात्रतेशिवाय उपचार करणाऱ्या व्यक्ती आणि बेकायदेशीर गर्भपाताच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटकातील आरोग्य यंत्रणांमध्ये समन्वय आवश्यक आहे.
करजगीतील कारवाईनंतर या प्रकरणातील संशयितांची भूमिका, संबंधित ठिकाणी नेमक्या कोणत्या वैद्यकीय प्रक्रिया सुरू होत्या आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.




