२२ वर्षांनंतर सांगली जिल्हा बँकेवर काँग्रेसचा अध्यक्ष | महेंद्र लाड यांची बिनविरोध निवड, शिवसेनेचे तानाजी पाटील उपाध्यक्ष

0
5

भाजपला सत्तास्थापनेत धक्का; विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे वर्चस्व, अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड बिनविरोध

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीत राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. तब्बल २२ वर्षांनंतर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसला संधी मिळाली असून काँग्रेसचे नेते महेंद्र लाड यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तानाजी पाटील यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष करत गुलालाची उधळण केली.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत कोणत्याही एका गटाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. भाजप महायुती आणि काँग्रेस महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत झाली होती. त्यामुळे अध्यक्षपदाची निवड कोणाच्या पारड्यात जाणार, याबाबत जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती.

बँकेच्या २१ संचालकांमध्ये काँग्रेस नेतृत्वाखालील आघाडीचे सहा, भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे चार, शिवसेनेचे तीन आणि अजित पवार गटाचे दोन संचालक निवडून आले होते. तर माजी खासदार संजयकाका पाटील हे अपक्ष म्हणून विजयी झाले होते. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी त्यांची भूमिका निर्णायक ठरणार होती.

अध्यक्षपदाच्या निवडीत अखेर काँग्रेसने बाजी मारली. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जिल्हा बँकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. महाविकास आघाडी आणि महायुतीतील राजकीय समझोत्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध पार पडल्याचे सांगितले जात आहे.

महेंद्र लाड यांच्या निवडीमुळे जिल्हा बँकेच्या राजकारणात काँग्रेसला तब्बल दोन दशकांनंतर अध्यक्षपद मिळाले आहे. दुसरीकडे उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या तानाजी पाटील यांची निवड झाल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांची नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

जिल्हा बँक ही शेतकरी, सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाची संस्था मानली जाते. त्यामुळे नव्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसमोर बँकेचा कारभार अधिक सक्षम करणे, शेतकऱ्यांना कर्जपुरवठा आणि सहकार क्षेत्राचा विस्तार ही महत्त्वाची आव्हाने असणार आहेत.

फोटोओळ : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी महेंद्र लाड, तर उपाध्यक्षपदी तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर समर्थकांनी जल्लोष केला.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here