जत पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यांसाठी चौघांची नावे निश्चित |भाजपकडून दिग्विजय चव्हाण, सोमनिंग बोरामनी, भानुदास राजगे; काँग्रेसकडून सुभाष बिरादार यांना संधी

0
2

जत : जत पंचायत समितीमधील स्वीकृत सदस्य निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपकडून माजी पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, पश्चिम मंडळ अध्यक्ष सोमनिंग बोरामनी आणि कुणीकोनूर येथील भानुदास राजगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे. तर काँग्रेसकडून मेंढेगिरीचे सरपंच सुभाष बिरादार यांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पंचायत समितीतील स्वीकृत सदस्य निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

१८ सदस्यसंख्या असलेल्या जत पंचायत समितीवर भाजपची एकहाती सत्ता आहे. पक्षीय बलाबलानुसार भाजपचे १२, काँग्रेसचे चार, तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन सदस्य आहेत. शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही महानगरपालिका व नगरपालिकांच्या धर्तीवर स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्यसंख्येच्या १० टक्के, तर पंचायत समितीच्या सदस्यसंख्येच्या २० टक्के सदस्य स्वीकृत म्हणून निवडले जाणार आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेत सहा, तर जत पंचायत समितीत चार स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे.

भाजपने डफळापूर येथील माजी पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांना पुन्हा संधी देण्याचे निश्चित केले आहे. तसेच पक्षसंघटनेत पश्चिम मंडळाची जबाबदारी सांभाळणारे सोमनिंग बोरामनी आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांना ठराव देणारे कुणीकोनूर येथील भानुदास राजगे यांचीही नावे निश्चित झाल्याचे समजते. काँग्रेसकडून माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी मेंढेगिरीचे सरपंच सुभाष बिरादार यांना संधी देत नव्या चेहऱ्याला प्राधान्य दिल्याचे बोलले जात आहे.

### जिल्हा परिषद स्वीकृत सदस्य निवडीत जतवर अन्यायाची भावना

जत तालुक्याने भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठे बळ दिले आहे. नगरपरिषद आणि पंचायत समितीवर भाजपने सत्ता मिळवली, तर जिल्हा परिषद निवडणुकीत नऊपैकी आठ जागांवर विजय मिळवला. जिल्हा परिषदेतील भाजपच्या संख्याबळात जत तालुक्याचा मोठा वाटा आहे.

मात्र, जिल्हा परिषदेच्या सहा स्वीकृत सदस्यांच्या निवडीत जत तालुक्याला अपेक्षित प्रतिनिधित्व मिळाले नसल्याची भावना भाजप कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. तालुक्याने पक्षाला भरभरून यश दिले असतानाही स्वीकृत सदस्य निवडीत जतच्या वाट्याला निराशा आल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पंचायत समितीतील स्वीकृत सदस्य निवडीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here