जत,संकेत टाइम्स : जत नगरपरिषदेत शासनाकडून कोट्यवधी रूपयांचा निधी आणून विकासाची गंगा वाहती ठेवण्यात येत आहे. नेमके याच वाहत्या गंगेत सत्ताधा-यांनी हात धुऊन घेण्याचे अनेक कारनामे केल्याची चर्चा आहे. काही कारभाऱ्यांनी स्वत:च ठेकेदारी सुरु केली.
काहींनी ठेकेदारांना पोसण्याचे उद्योग केले. जादा दराच्या निविदा, बेकायदा आणि बोगस कामे, निकृष्ट दर्जाची कामे, अशा एक ना अनेक कामांचा पायंडाच सत्ताधा-यांनी सुरु असल्याचे आरोप करत वारवांर विरोधी सदस्यांकडून घेरण्यात येत आहे.तरीही कारभार सुधारत नसल्याचे चित्र आहे.
बेकायदा कामांवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत असताना, केवळ सत्ताधारी कारभारीच याला जबाबदार होते,अशी परिस्थिती नव्हती. अधिकाऱ्यांना हाताशी धरून विकासाच्या गोंडस नावाखाली भ्रष्ट कारभार बोकाळला होता. विरोधी सदस्यांनी अकांडतांडव करून देखील भ्रष्ट कारभाराचे सर्व कारनामे दडपून ठेवण्यात येत आहेत.सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांचा हम करे सो कायदा, याप्रमाणेच कारभार सुरु आहे. किंंबहुना अनेक बेकायदा कामे नियमात बसवून करण्याची नामी शक्कल लढवण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षात भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही ना सत्ताधा-यांनी खदखद, ना प्रशासनाने आक्षेप केला. मिळून सारेहो…
असाच सर्व रागरंग सुरू असल्याचे आरोप होत आहेत. याचा फटका पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पालाही बसला आहे.मुख्याधिकारी नसल्याने सभाच रद्द करण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यावर आली आहे.