सांगली : कोरोना लस मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच आरोग्य विभागातील डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी यांना याबाबतचे परिपूर्ण प्रशिक्षण मिळावे यासाठी कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन (रंगीत तालीम) घेण्यात आली. ही मोहिम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यातील पहिल्या भागात शासकीय व खाजगी आरोग्य विभागाचे डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे.
त्यासाठी आज रंगीत तालीम घेतली असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.कोरोना लसीकरण मोहिमेची रंगीत तालीम आज मिरज तालुक्यातील कवलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सावंत, कवलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शितोळे, डॉ. भूपाल शेळके, मिरज पंचायत समितीचे उपसभापती श्री. पाटील आदि उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी पुढे म्हणाले, या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील पहिल्या भागात शासकीय व खाजगी आरोग्य विभागाचे डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी यांचे यशस्वीपणे लसीकरण पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या भागामध्ये फ्रंटलाईनवर काम करणाऱ्यांना (पोलीस विभाग, महसूल विभाग, इतर शासकीय विभाग, बँक कर्मचारी, आशा वर्कर्स आदि) लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण मोहिमेंतर्गत दोन डोस देण्यात येणार आहेत. पहिला डोस दिल्याच्या 28 दिवसानंतर दुसरा डोस देण्यात येणार आहे. यासाठी पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस घेण्याबाबतची माहिती जिल्हा परिषदेमध्ये कॉल सेंटर उभा करून देण्यात येणार आहे.
या रंगीत तालीमीमध्ये तीन विभाग तयार करण्यात आले. पहिल्या विभागामध्ये ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. यामध्ये आरोग्य विभागातील 25 कर्मचाऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. दुसऱ्या विभागामध्ये आधार नोंदणीची सत्यता पडताळणी करून लस देण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. तर तिसऱ्या विभागामध्ये रिकव्हरी रूमची व्यवस्था करण्यात आली. यामध्ये संबंधित लाभार्थ्याला (लस देणाऱ्याला) अर्धा तास थांबवून घेऊन त्यांना लसीकरणानंतर नियमितपणे कोरोना बाबतचे मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, शारिरीक अंतर पाळणे याबाबतचे महत्व सांगण्यात आले. लसीकरणानंतर रूग्णास जर काही त्रास होत असेल तर तातडीने उपचार करण्यासाठी स्वतंत्र बेडची व्यवस्थाही करण्यात आली होती. ही लस घेतलेल्यांचे आधार लिकिंग होणार आहे.