जत,प्रतिनिधी : शहर व परिसरात थंडीचा कडाका आता पुन्हा वाढू लागला आहे. शहराच्या किमान तापमानाचा पारा गुरुवारी (दि.3) 16 अंशांपर्यंत घसरला. पहाटेच्या सुमारास शहरात धुक्याची चादर पसरत आहे.पहाटेच्या सुमारास तसेच रात्री शहरात बोचरी थंडी जाणवू लागली आहे.
यामुळे जतकरानी पुन्हा उबदार कपड्यांचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे.डिसेंबरच्या सुरूवातीस पुन्हा थंडीचा ‘कम बॅक’ होताना दिसत आहे. पारा हळूहळू 15 अंशांच्याजवळ जाऊ लागला आहे. किमान तापमानासह कमाल तापमानाचा पाराही दोन दिवसांपासून 30 अंशांपेक्षा खाली आला आहे.
यामुळे जतकरांना वातावरणात गारठा जाणवू लागला आहे. मंगळवारपासून कमाल तापमान 28 व 29 अंश इतके नोंदविले गेले. थंडीचा कडाका आता पुन्हा हळूहळू वाढत आहे. शहरातील वातावरणामध्ये रात्री दहा वाजेपासून गारवा वाढून पहाटेपर्यंत कायम राहत आहे.
थंडीचा ऋतू आरोग्यवर्धक मानला जात असल्यामुळे पहाटे तसेच संध्याकाळच्या सुमारास फेरफटका मारणाऱ्यांची संख्याही आता वाढताना दिसते आहे.