जत,प्रतिनिधी : पुणेशिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत गेल्या 25 दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मेळावे, प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर दिला.आज होणाऱ्या मतदानसाठी सर्व उमेदवारांचा कस लागणार आहे.या दोन्ही मतदारसंघांसाठी एकूण 98 उमेदवार रिंगणात असून, त्यांचे भवितव्य आज मंगळवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतपेटीमध्ये बंद होणार आहे.
शिक्षक मतदारसंघातून 35, तर पदवीधर मतदारसंघामधून 63 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या दोन्ही मतदारसंघांतून विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत, महाविकास आघाडीचे प्रा. जयंत आसगावकर आणि अरुण लाड, भाजपचे संग्राम देशमुख, राज्य शिक्षक परिषदेचे जितेंद्र पवार, इतिहास अभ्यासक डॉ. श्रीमंत कोकाटे, रेखा पाटील, आदींचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी दि. ५ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली.
आरोप-प्रत्यारोपांनी प्रचार रंगला. वचननाम्यांतून शिक्षक, पदवीधरांचे प्रश्न सोडविण्याचे व्हिजन उमेदवारांनी मांडले. आज मंगळवारी मतदान होईल. त्यानंतर गुरुवारी (दि.3डिसेंबर) पुणे येथील विभागीय कार्यालयात मतमोजणी होणार आहे.प्रचारात एसएमएस आणि सोशल मीडियावर संदेश पाठवून उमेदवारांनी मतदारांना मतदानासाठी आवाहन केले आहे.जत तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
तालुक्यात शिक्षक निवडणूकीसाठी शेगाव,माडग्याळ, उमदी,संख,जत येथे मतदान केंद्रे असून एकूण 754 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
पदवीधर मतदार संघासाठी शेगाव,माडग्याळ, उमदी,संख,जत 2,डफळापूर अशी सात मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत.तर 2712 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.दोन्ही प्रमुख पक्षासह अपक्षांनी सर्व तयारी पुर्ण केली आहे.