सांगली : पुणे विभागाच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक असून सर्वच राजकीय पक्षाच्या तसेच अपक्ष उमेदवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने नेमून दिलेल्या आचारसंहितेचे काटेकोरपणाने पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ . अभिजित चौधरी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने आज प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक बुथवर 100 टक्के वेब कास्टिंग करण्यात येणार आहे.
या निवडणुकीबाबत जिल्ह्यातील मतदात्याला, उमेदवारांना, प्रतिनिधींना शंका असल्यास त्यांनी 1950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर संबंधित उमेदवारांच्या प्रचारसभेत सोशल डिस्टंन्सिंगचे पालन व्हावे, ते पालन न झाल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.