देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील ‘मातोश्री’, ‘सिल्वर ओक’समोर ढोल वाजवणार कां | गोपीचंद पडळकरांच्या मागणीला भाजपचा पाठिंबा आहे कां? विक्रम ढोणे

0



जत,प्रतिनिधी : भाजपचे प्रवक्ते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर एसटी आरक्षणाचा जीआर राज्य शासनाने काढावा या मागणीसाठी पंढरपूरमध्ये ‘ढोल बजाओ’ आंदोलन केले. या मागणीला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा आहे का, याचे स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी द्यावे, अशी मागणी धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे.




तसेच पडळकरांनी पुढील ‘ढोल बजाओ’ आंदोलन ‘मातोश्री’ आणि ‘सिल्वर ओक’बाहेर करण्याचे जाहीर केले आहे. त्या आंदोलनात फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे ढोल वाजविताना दिसतील कां? असा सवालही ढोणे यांनी केला आहे.




गोपीचंद पडळकर हे आरक्षणप्रश्नी सातत्याने धनगर समाजाची दिशाभूल करत आहेत. पडळकर हे भाजपच्या व्होटबँक पॉलिटिक्ससाठी चुकीच्या मागण्या करून आंदोलनाचे शस्त्र बोथट करत असल्याची टीका धनगर विवेक जागृती अभियानाने केलेली आहे. 25 सप्टेंबरला पडळकर यांनी पंढरपूरमध्ये केलेल्या आंदोलनात राज्य शासनाने जीआर काढून आरक्षण द्यावे, या आरक्षणाचा केंद्राशी संबंध नाही, अशी भुमिका घेतली आहे. त्यावरही अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. 




यासंबंधाने पत्रकारांशी बोलताना ढोणे म्हणाले की, पडळकरांनी धनगर आरक्षणाचा वापर स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी केलेला आहे. या विषयाचा त्यांचा कोणताही अभ्यास नाही. आक्रमकपणे खोटे बोलून त्यांनी लोकसभा निवडणुकीपुर्वी समाजाची मोठी फसवणूक केली आहे. एसटीचा दाखला घेतल्याशिवाय माघार नाही अशी भाषणे करणारे पडळकर हे भाजपशी सेटिंग करत होते. त्यांनी समाजाशी गद्दारी करून भाजप प्रवेश केला व विधान परिषदेची आमदारकी मिळवली. त्यानंतर आता भाजपच्या सोयीसाठी धनगर समाजाला भडकावण्याचे काम सुरू केले आहे. त्यासाठी अत्यंत चुकीच्या मागण्या केल्या जात आहेत. 




मग फडवणीसांनी कां केले नाही?


मराठा आरक्षणाच्य़ा स्थगितीचा निर्णय आल्यावर अध्यादेश काढण्याची चर्चा सुरू झाल्यावर पडळकरांनी धनगर आरक्षणाचा जीआर काढण्याची मागणी केली. मुळात ही मागणी गैरलागू आणि पडळकरांची वैचारिक दिवाळखोरी सिद्ध करणारी आहे. धनगर एसटी आरक्षण हा केंद्र शासनाशी संबंधित विषय आहे. हे आरक्षण घटनात्मक असल्याने ते राष्ट्रपतींच्या सहीने जाहीर होते. ही प्रक्रिया असताना राज्य शासनाने जीआर काढावा, अशी मागणी करणे हास्यास्पद आहे.



मात्र पडळकर हे भाजपमध्ये स्वत:चे महत्व वाढवण्यासाठी समाजाच्या मागणीचे हसे करत आहेत. असा जीआर काढणे शक्य होते तर देवेंद्र फडणवीसांनी तो कां काढला नाही, याचे उत्तर पडळकर देत नाहीत. पडळकरांसाठी देवंद्र फडणवीस हे गॉडगिफ्ट आहेत. डिपॉझिट जप्त झालेल्या पडळकरांना आमदारकी दिल्याने ते फडणवीसांच्या उपकाराच्या बोजाखाली दबलेले आहेत. त्यांनी त्यांची जरूर चाकरी करावी, मात्र समाजाला वेड्य़ात काढायचा धंदा करू नये. भाजपची चमचेगिरी करायचीच असेल तर फडणवीसांनी धनगर एसटी आरक्षणाचा जीआर कां काढला नाही, त्यांचा हात कुणी धरला होता, याचे उत्तर द्यावे, असा सवाल ढोणे यांनी केला आहे.




पडळकर चंद्रकांत पाटलांपेक्षा ज्ञानी झाले आहेत कां?


राज्य शासनाने जीआर काढावा, अशी मागणी पडळकरांनी केल्याच्या पार्श्वभुमीवर गेल्यावर्षीचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ‘धनगर एसटी आरक्षणाचा प्रश्न हा केंद्र शासनाच्या अखत्यारित आहे. राज्य शासनाच्या हातात शिफारस करणे आहे, ते आम्ही करत आहोत’ असे चंद्रकांत पाटील यांनी त्यात म्हटले आहे. त्यामुळे पडळकरांची मागणी अर्धवट असल्याचे स्पष्ट झाले आहे.


Rate Card



चंद्रकांत पाटलांनी आरक्षणाची घटनात्मक प्रक्रिया सांगितली ती खरी आहे, मात्र त्यांच्या सरकारने शिफारस केलीच नाही. त्याचे उत्तर पडळकर यांनी भाजप प्रवक्ते म्हणून आधी दिले पाहिजे. पडळकर यांची ही भुमिका देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना मान्य आहे का, हेही त्यांना जाहीर केले पाहिजे. तसेच धनगर आऱक्षणासंबंधी भाजपने नेमकी भुमिका स्पष्ट करायला हवी, अशी मागणीही ढोणे यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना पडळकरांची भुमिका मान्य असेल तर मातोश्री आणि सिल्वर ओकसमोर होणाऱ्या ढोल बजाओ आंदोलनात ते पाहायला मिळतील कां, असा सवालही ढोणे यांनी विचारला आहे.




एसटीचा तरी फरक कळतो कां?


धनगर आरक्षणप्रश्नी खाजगी व्यक्तींनी दाखल केलेल्या याचिकांमध्ये फडणवीस सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत पडळकर सातत्याने चुकीची माहिती देत आहेत. धनगर आणि धनगड एकच आहेत, असे प्रतिज्ञापत्र दिल्याचे पडळकर सांगतात, पण प्रतिज्ञापत्रात तसे काही म्हटलेले नाही. आता ते महाराष्ट्रात धनगड नाहीत तर धनगर आहेत असे प्रतिज्ञापत्र दिल्याचे सांगत आहेत, त्यावरून आरक्षण द्या म्हणत आहेत. याप्रमाणे आरक्षण देण्याच्या पद्धतीला भाजपचा पाठिंबा आहे का, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. हरियाणातील धनगर (गडरिया) समाजाला नुकतेच एससी आरक्षण देण्यात आले आहे. तसे आरक्षण पडळकर मागत आहेत. महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटीचे आरक्षण हवे आहे, मात्र पडळकर एससीचे उदाहरण देत आहेत.



 शिवाय ते आऱक्षण कोर्टात अडकलेले आहे. त्यांना एससी आणि एसटीचा फरक कळत नाही, हेच यावरून स्पष्ट होत आहे. तो फरक तरी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पडळकरांना समजावून सांगावा, असे ढोणे यांना म्हटले आहे. 




धनगर आरक्षणाची चेष्टा उडवू नका!


धनगर आरक्षणप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा आश्वासने दिली, मात्र प्रत्यक्ष कार्यवाही केलेली नाही. धनगर आरक्षणाची आंदोलने ही भाजप पुरस्कृत होती, हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. भाजपने धनगर मतांसाठी या प्रश्नात हवा भरली आणि मते मिळताच धनगर आऱक्षणाचे आंदोलन विकलांग केले आहे. आता तर पडळकर हे चित्रविचित्र मागण्या करून करमणुक करत आहेत. ते आमदारपदाचीही रया घालवत आहेत. त्यामुळे भाजपने धनगर समाजाला वेड्यात काढण्याचा उद्योग बंद करावा. याप्रश्नी केंद्र सरकारच्या पुढाकाराने सकारात्मक काही करता येते कां ते पहावे, असे ढोणे यांनी म्हटले आहे.





 अभियानाची भुमिका


फक्त मागणी करून आरक्षणाचा प्रश्न सुटत नसतो. त्याची काही प्रक्रिया असतो. मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्यापद्धतीने अजेंड्यावर घेतला गेला, त्याप्रमाणे धनगर आरक्षणाचा प्रश्न घेतला जावा. राज्य शासनाने पहिल्यांदा याप्रश्नी मंत्री समिती स्थापन करावी, केंद्र शासनाने याप्रश्नीसमिती स्थापन करून प्रक्रिया पार पाडावी, अशी धनगर विवेक जागृती अभियानाची मागणी आहे. या मागणीसाठी अभियानाने नुकतेच 3 हजार सहयांचे निवेदन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिले आहे.



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.