जत,प्रतिनिधी : जत शहरासह जिल्ह्यातील खासगी दवाखान्यांमधील ‘बायोमेडिकल वेस्ट’चे बेवनूर येथील जागेत आणून विल्हेवाट लावली जात आहे.त्यात कोरोना रुग्णावर उपचारा दरम्यान वापरलेले साहित्य असण्याची भिती व्यक्त केली जात आहे.शिवाय ते साहित्य दुधेभावी रोडनजिकच्या लोंखडे मळ्यानजिकच्या माळरान असलेल्या जमिनीत किरकोळ खड्डा काढून पुरण्यात येत आहे.त्यामुळे धोका निर्माण झाला असून हा प्रकार तात्काळ थांबवावा,अशी मागणी दादासो वाघमोडे यांनी केली आहे.
शासकीय आणि खासगी दवाखान्यांमधून दैनंदिन बाहेर पडणारा ‘जैववैद्यकीय कचरा’ (बायोमेडिकल वेस्ट) उचलून नेण्याकरिता सांगलीतील खासगी कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे.या कंपनीकडून जमा केलेला हा जैविक कचरा बेवनूर हद्दीतील लोंखडे मळ्यानजिकच्या जमिनीत आणून विल्हेवाट लावली जात आहे.
मोठ्या प्रमाणात जैव वैद्यकीय कचरा बाहेर पडतो. त्यात रिकाम्या झालेल्या सलाईन्सच्या बॉटल्स, इंजेक्शन्स, शस्त्रक्रियेदरम्यान वापरल्या जाणारे साहित्य यासह इतरही मानवी आणि पशूप्राण्यांच्या आरोग्यास घातक ठरु पाहणाऱ्या कचऱ्याचा समावेश आहे.त्याशिवाय आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना बाधित रुग्णावर उपचार करताना वापरलेले साहित्यही त्यात असण्याची भिती व्यक्त होत आहे.
त्यात त्यांची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावली जात नाही,खडकाळ जमिनीत जेमतेम एक दोन फुटाचा खड्डा काढून हे साहित्य पुरण्यात येत असल्याने नागरिकांना धोका निर्माण झाला असल्याचेही वाघमोडे यांनी सांगितले.याबाबत आम्ही तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे तक्रार केल्याचेही त्यांनी सांगितले.