जत,प्रतिनिधी : कोरोना मुळे बंद असलेले जनावरांचा बाजार पुन्हा पुर्वरत चालू करा,अशी मागणी रिपाइचे
जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे यांनी केली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जत तालुक्यातील मार्चपासून सर्व जनावरे बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांची विक्री थांबली आहे. जत,कवठेमहांकाळ आटपाडी हे कायम दुष्काळी तालुके असलेले तालुक्यातील शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे साधन पशुपालन आहे.माडग्याळ मेंढी कर्नाटक आंध्रप्रदेश या राज्यात चांगल्या चवीच्या मटणासाठी प्रसिद्ध आहे.
त्यामुळे माडग्याळ या गावी शुक्रवारी भरणाऱ्या जनावरे बाजारासाठी कर्नाटक, आंध्रप्रदेश या भागातून मोठ्या प्रमाणात व्यापारी येतात.सर्वसाधारणपणे कोट्यावधी रुपयाची उलाढाल या जनावरे बाजारात होते.त्यामुळे या परिसरातील बहुसंख्य गावातील पशूपालक माडग्याळ मेंढी शेतकऱ्याने संगोपन केले आहे,परंतु गेल्या मार्चपासून बाजार बंद असल्याने शहरातील जनावरे व्यापारी व दलाल खेडोपाडी फिरून लहान मोठी जनावरे कवडीमोल किंमतीने खरेदी करत आहेत.
या व्यापाऱ्यांना आर्थिक अडचणीमुळे जनावरे विकण्याशिवाय शेतकऱ्यांच्या पुढे दुसरा पर्याय उरलेला नाही.जनावरे विकल्याशिवाय प्रपंच चालत नाही, हे गुपित दलालांना माहीत असल्यामुळे शेतकऱ्यांना वेठीस धरून कवडीमोल किमतीने लहान-मोठी जनावरे खरेदी करीत आहेत.कोरोनाच्या फटक्यामुळे एकीकडे शेतमालाला दर नाही.दुसरीकडे हाताच्या फोडाप्रमाणे जपलेले पशुधन मातीमोल किंमतीला विकले जात असल्याने शेतकरी दुहेरी अडचणीत आला आहे. त्यामुळेे बाजार समितीने सोशल डिस्टसिंग, मास्क,सँनिटायझरचा वापर करत जनावरे बाजार सुरू करावेत असेही साबळे यांनी म्हटले आहे.










