प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर हे तर ‘बंडलबाज’

0जत,प्रतिनिधी : शिवसेनेचे समर्थक, माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे धनगर आरक्षण मुद्द्याचा वापर स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी करत आहेत. धनगर आरक्षण ही या दोघांसाठी वैयक्तिक लाभाची योजना असल्याने समाजाने या बंडलबाज नेत्यांपासून सावध राहावे, असे आवाहन धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केले आहे.
गेल्या आठवड्यात मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अध्यादेश काढण्याचा पर्याय पुढे आला आहे. त्यावर चर्चा सुरू झाल्यानंतर सध्या शिवसेनेशी संलग्न असलेले माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी मराठा आरक्षणाबरोबरच धनगर एसटी आरक्षणाचा अध्यादेश (जीआर) काढावा, अशी मागणी केली आहे. धनगर आरक्षणाचा अध्यादेश काढला नाही तर धनगर समाज सरकारला सळो की पळो करून सोडेल, असा इशारा दिला आहे. तसेच राज्यभरात धनगरांचे एल्गार आंदोलन घोषित केले आहे.  
प्रकाश शेंडगे यांच्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा जीआर काढून ताबडतोब दाखले देण्याची मागणी केलेली आहे. तसेच आंदोलनाची भुमिका जाहीर केली आहे. या माध्यमातून हे दोन्ही नेते आपल्या स्वार्थी राजकारणासाठी भोळ्याभाबड्या समाजाचा वापर करत आहेत. वस्तुत: अनुसुचित जमातीचे (एसटी) आरक्षण हा घटनात्मक विषय आहे. केंद्र शासनाच्या पातळीवर प्रक्रिया राबवली गेल्यानंतर राष्ट्रपती यासंबंधीचा आदेश काढतात. ही सर्वमान्य प्रक्रिया असताना महाराष्ट्र शासनाने अध्यादेश काढावा अशी मागणी करण्याचा प्रकार म्हणजे वैचारिक दिवाळखोरी आहे. महाराष्ट्र शासनाने यासंबंधाने शिफारस करायची असताना प्रकाश शेंडगे आणि गोपीचंद पडळकर हे उलट्यासुलटया मागण्या करून समाजाची संभ्रमावस्था वाढवत आहेत. धनगर समाजाच्या सहनशीलतेचा अंत हे नेते पाहत आहेत. दर दोन चार वर्षांनी एखांदा नेता आरक्षणाच्या नावाखाली समाजाच्या भावना भडकावतो आणि स्वार्थ साधून घेतो, असे चित्र आहे. प्रत्येक वेळी हे नेते आरक्षण मिळवण्याची वेगळी पद्धत सांगतात आणि समाजाला फसवतात. 
माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यापासून समाजाच्या विश्वासघाताची सुरू झालेली परंपरा आता गोपीचंद पडळकर यांच्यापर्यंत आली आहे. हे लोक समाजाची ताकद दाखवून स्वत: पदे लाटत आहेत. भाजपसारख्या पक्षांचे हस्तक होवून या नेत्यांनी वेळोवेळी बंडलबाजपणा करून समाजाला फसवलेले आहे. त्यांनी कधीही आरक्षणाची चळवळ गांभिर्याने केलेली नाही. 2004 साली अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना त्यांच्या उपस्थितीत भाजपने पंढरपूरमध्ये धनगर मेळावा घेतला. त्यासाठी प्रकाश शेंडगे यांना भाजपने पुढे केले. वाजपेयी हे धनगर आरक्षण जाहीर करणार म्हणून राज्यातील धनगर समाज तिथे गोळा करण्यात आला. राजकारणासाठी नाही तर आरक्षणासाठी हा सामाजिक मेळावा आहे, असे प्रकाश शेंडगे त्यावेळी सांगत होते, मात्र त्या मेळाव्यात प्रकाश शेंडगे यांनी राजकारण केले. समाजाला फसवून त्याच मेळाव्यात भाजपप्रवेश केला. काही दिवसांनी प्रकाश शेंडगेंना भाजपने आमदारकी दिली. हेच प्रकाश शेंडगे आता राज्यपाल कोट्यातील आमदारकीसाठी नवा डाव खेळत आहेत. 

Rate Card
मराठा आरक्षण आणि धनगर एसटी आरक्षण हे दोन स्वतंत्र विषय असताना प्रकाश शेंडगे हे जाणीवपुर्वक गुंता वाढवत आहेत. मुळात प्रकाश शेंडगे यांचा समाजाशी किती संवाद आहे हा प्रश्नच आहे. ते टिव्हीवरचे नेते आहेत. धनगर एसटी आरक्षणाचा अध्यादेश काढून राज्य शासन आरक्षण देवू शकते काय, याचे तर्कसंगत उत्तर प्रकाश शेंडगे यांनी समाजाला द्यायला हवे होते आणि मग भुमिका घ्यायला हवी होती. असा अध्यादेश काढून आरक्षण मिळते तर ते आजवर गप्प कां होते, याचेही उत्तर शेंडगेंनी द्यायला हवे. मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाली नसती तर त्यांनी ही मागणी केली असती कां? आता महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाचा अध्यादेश काढला नाही तर धनगरांसाठी अध्यादेशाची मागणी सोडून देणार आहेत का, याचे उत्तर शेंडगेंनी दिले पाहिजे, असे विक्रम ढोणे यांनी म्हटले आहे.
गोपीचंद पडळकर यांनी तर फार कमी काळात समाजाला गंडा घातला आहे. लोकसभा निवडणुकीअगोदर गोपीचंद पडळकर आणि उत्तम जानकर यांनी धनगर आरक्षणाचा अखेरचा लढा हे कथित आंदोलन केले. आंदोलनाच्या नावाखाली यांच्या सभा आणि चित्रपटाचे शुटिंग सुरू होते. स्टेजवर हे भाजपला शिव्या घालत होते आणि चर्चेला गेल्यावर भाजपशी सेंटिंगची बोलणी करत होते. 100 दिवसांत आरक्षणाचे सर्टिफिकिट मिळवून देणार म्हणून पडळकर आणि उत्तम जानकर हे युवकांना भडकवत होते. त्यांना समाजाने साथ दिली, मात्र आरक्षण मिळाले नाही. उत्तम जानकर आणि पडळकर यांनी समाजाला वाऱ्यावर सोडून पुन्हा भाजपप्रवेश केला. या दोघांनी राजकीय स्वार्थासाठी आरक्षण लढयाचा शेवट केला. त्यामुळे त्या लढ्याचे काय झाले, याचे उत्तर आधी पडळकरांनी द्यावे. पडळकर हे आता जीआर काढा असे म्हणत आहेत मग त्यांच्यासाठी ‘गॉडगिफ्ट’ असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी तो जीआर काढला नाही, याचे उत्तर पडळकरांनी द्यायला हवे, असे विक्रम ढोणे यांनी म्हटले आहे.shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.