जत,प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील मुद्रांक विक्रेते भिडे यांचे नुकताच कोरोनाने बळी घेतल्याने जिल्ह्यातील मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक यांच्यामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.मुद्रांक विक्रेते व दस्तलेखनिक यांचा थेट संबंध हा पक्षकारांशी येत असल्याने त्यांना कोरोनाचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
मुद्रांक विक्रेते हे आपल्या जिवावर उदार होऊन शासकिय कार्यालय परिसरात मुद्रांक विक्री व्यवसाय करित आहेत.मुद्रांक विक्रेते यांच्याकडे सर्वच स्तरातील व्यक्ती या मुद्रांक खरेदी करण्यासाठी येत असतात.
या व्यक्तीचा सरळ सबंध मुद्रांक विक्रेते यांच्याशी येत असल्याने कोरोनासारख्या महामारीपासून कितीही बचाव करावा म्हंटले तर मुद्रांक विक्रेते यांना ते शक्य होत नाही. त्यामुळे मुद्रांक खरेदी करण्यासाठी किंवा एखादा खरेदी विक्री दस्त तयार करण्याचे काम करण्यासाठी कोरोना पाॅझीटीव्ह रूग्ण आल्यास त्याचा संसर्ग या विक्रेत्यांशी येत असल्याने मुद्रांक विक्रेते हे कोरोना पाॅझीटीव्ह होण्याचे प्रमाण जास्त आहे.यातूनच भिडे सारखे मुद्रांक विक्रेते हे कोरोना पाॅझीटीव्ह होऊन त्यांचा बळी गेला आहे.
सरकारने मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक यांना त्यांच्या संरक्षणासाठी विमा कवच संरक्षण द्यावे अशी मागणी यापूर्वीही मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक संघटना यांच्या कडून जिल्हाधिकारी,सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, आयुक्त,महसुल मंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.








