उंटवाडी सोसायटीच्या कारभाराची चौकशी करा | सहायक निबंधकाकडे निवेदनाद्वारे मागणी
जत,(प्रतिनिधी) : विकास सहकारी संस्था ह्या ग्रामीण भागातील सहकाराचा कणा आहेत, त्यास छेद देण्याचा प्रकार उंटवाडी सोसायटी करत आहे.संस्थेच्या कामकाजात सुधारणा करावी, हंगामापुर्वी शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप करावे अशी मागणी करणारे निवेदन काही संचालक व शेतकऱ्यांनी सहायक निबंधक यांना दिले आहे.
सचिवांच्या वारंवार तक्रारीची दखल घेऊन वरीष्ठ विभागाने बदली केली आहे.सचिव बदलाबाबत चेअरमनचे आरोप बिनबुडाचे असल्याचा आरोप संस्थेच्या काही संचालक व सभासदांनी केला आहे.पदाधिकाऱ्यांनी बालहट्ट सोडून आडमुठी भूमिका न घेता नव्या सचिवांना रुजू करून घेऊन संस्थेचे दैनंदिन कामकाज सुरू करावे, हंगाम संपण्यापूर्वी प्रतीक्षेत असलेल्या पन्नास टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप करावे अशीही मागणी आहे.

सहायक निबंधक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेली दोन महिने संस्थेचे कार्यालय बंद ठेवले आहे,दप्तर घरी नेऊन नियमबाह्य कर्ज वाटप केली जात आहेत. संस्थेत अनियमितता व सदस्यांची आर्थिक लुबाडणूक केली जात असल्याचे आरोप आहेत.सर्वसामान्य शेतकऱ्यांना इतर बँकांच्या एनओशी घेऊन या म्हणत अडवणूक केली जात आहे.सद्याच्या करोना महामारीत शेतकऱ्यांना एनओशी साठी बँकांच्या दारात उभं केलं जात आहे. त्यासाठी वेळ व पैसा वाया जात आहे, कामधंदा सोडून 7-8 बँकेत रांगा लावाव्या लागत आहेत.हा सगळा प्रकार पाहून भीक नको पण कुत्रं आवर” अशी म्हणायची वेळ संस्थेच्या सभासदांवर आली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांकडून दंडव्याज व 6 महिन्यांचे अतिरिक्त व्याज आकारले जात आहे. शासनाचे आदेश असताना सुद्धा संस्था लुबाडणूक करीत आहे.रीतसर पावती न देणे, शेअर मर्यादा रक्कम ओलांडली तरी अशिक्षित शेतकऱ्यांकडून शेअर रक्कम कापली जात आहे.आर्थिक वर्षाअखेर परतफेड व नव्याने कर्जवाटप यासाठी कमिशन घेणे, स्वतःसाठी व कमिशन देणाऱ्यास तारणविरहित कर्ज वाटप केलं जात आहे. सदस्यांच्या हिताची जपणूक करण्यास संचालक मंडळ असमर्थ असून सहकार अधिनियमातील तरतुदीनुसार सहायक निबंधक यांनी संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमून कामकाज सुरळीत करावे असे निवेदनात मागणी केली आहे.निवेदनावर पांडुरंग पवार, गुंडू पवार, राजाराम साळुखे, विश्वनाथ तळसंगी,काडेश आरगोडी, पांडुरंग सुतार, विजय शिरश्याड, पांडुरंग काटकर यांच्या सह्या आहेत.
